बबलादच्या जिल्हा परिषद शाळेतील दुर्घटनेने शिक्षण विभागाचा कारभार चव्हाट्यावर; सर्व शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी
सोलापूर,दि.१२- : अक्कलकोट तालुक्यातील मौजे बबलाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेचे छत कोसळून १३ विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी झाल्याच्या गंभीर घटनेने जिल्ह्यातील शाळांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या संबंधित अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार आणि मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करून सखोल चौकशी करावी, अशी आक्रमक मागणी वंचित बहुजन आघाडीच्या सोलापूर जिल्हा शाखेने केली आहे.
यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
११ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास प्रार्थना संपल्यानंतर विद्यार्थी वर्गात जात असताना शाळेचे छत अचानक कोसळले. या दुर्घटनेत १३ विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
निधी कुठे खर्च झाला? वंचितचा सवाल
शाळांच्या इमारतींची दुरुस्ती व देखभालीसाठी जिल्हा परिषदेकडून आतापर्यंत किती निधी उपलब्ध झाला आणि कोणत्या शाळेवर किती निधी खर्च करण्यात आला, याचा संपूर्ण अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
तसेच सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांची एकूण संख्या, शिक्षकांची संख्या आणि विद्यार्थ्यांची पटसंख्या याबाबतही अधिकृत अहवाल देण्याची मागणी करण्यात आली.
सर्व शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करा
बबलाद येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे. धोकादायक आणि जीर्ण इमारतींची तातडीने दुरुस्ती करून विद्यार्थ्यांच्या जीविताला असलेला धोका दूर करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
याशिवाय प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी आणि आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. शाळांना आतापर्यंत देण्यात आलेल्या विविध सुविधांचा स्वतंत्र अहवाल सादर करावा, अशीही मागणी करण्यात आली.
अधिकाऱ्यांशी शाब्दिक वाद; जिल्हा परिषदेत काही काळ तणाव
निवेदन देण्याच्या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनेकर यांच्या कथित उद्धट बोलण्यावरून वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला. त्यामुळे काही काळ जिल्हा परिषद परिसरातील वातावरण तणावपूर्ण झाले.
आंदोलनाचा इशारा
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न प्रशासनाने गांभीर्याने न घेतल्यास आणि दोषींवर कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडी खांबे, प्रशांत गोळेवार, युवक शहराध्यक्ष महेश जाधव, युवक शहर सचिव नरेंद्र शिंदे, शहर महासचिव विनोद इंगळे, सुहास सावंत, शाहिद शेख, शरीफ शेख, अक्कलकोट तालुकाध्यक्ष विशाल ठोंबरे, दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष सुरेश देशमुख, विजय गायकवाड, विजयानंद उघडे, श्रीनिवास संगेपान आदी पदाधिकारी उपस्थित होते.
“विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारा निष्काळजी कारभार खपवून घेतला जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई करून जिल्ह्यातील सर्व शाळांची सुरक्षितता सुनिश्चित करावी,” अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने मांडली आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज