"शहरात ताडीची झाडेच नाहीत, मग परवाना कसा?" – बनावट ताडीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
फलटण | प्रतिनिधी,दि.११-: फलटण शहरात अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या ताडी विक्री केंद्राविरोधात नागरिकांचा संताप वाढत असून, संबंधित ताडी विक्री केंद्राचा परवाना तात्काळ रद्द करून ते कायमस्वरूपी बंद करण्यात यावे, अशी जोरदार मागणी नागरिकांनी वंचित बहुजन न्यूजशी बोलताना केली आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ताडी विक्रीसाठी संबंधित परिसरात किमान ५०० ताडीची झाडे उपलब्ध असणे आवश्यक असल्याचा नियम आहे. मात्र, फलटण शहरात ताडीची झाडेच अस्तित्वात नसल्याचे दिसून येत असल्याने, अशा परिस्थितीत ताडी विक्री केंद्राला परवाना कसा देण्यात आला, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
याशिवाय, नैसर्गिक ताडी झाडातून काढल्यानंतर मर्यादित कालावधीतच पिण्यास योग्य व उपयुक्त असते, असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्याउलट, शहरात विक्री होणारी ताडी क्लोरोहायड्रेट पावडरपासून तयार केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे. या आरोपांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही.
भेसळयुक्त किंवा बनावट ताडीचे सेवन केल्याने अनेकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचा दावाही नागरिकांनी केला आहे. दुसरीकडे, या व्यवसायातून संबंधित विक्रेते दररोज हजारो रुपयांची कमाई करत असून, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या सर्व प्रकरणाची राज्य उत्पादन शुल्क विभाग, अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि स्थानिक प्रशासनाने सखोल चौकशी करून, तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास संबंधित ताडी विक्री केंद्राचा परवाना रद्द करावा व केंद्र कायमस्वरूपी बंद करावे, अशी मागणी नागरिकांनी वंचित बहुजन न्यूजमार्फत केली आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज