गिरवी ता.फलटण येथील दलित वस्तीत घाणीचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात!

बंदिस्त गटाराचे काम अपूर्ण; ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त

फलटण [प्रतिनिधी] : दिनांक 10 ऑगस्ट 2026,

फलटण तालुक्यातील गिरवी येथील दलित वस्तीत बंदिस्त गटाराचे काम अपूर्ण राहिल्याने मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सांडपाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

गिरवी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील दलित वस्तीत बंदिस्त गटाराचे काम पूर्ण न झाल्यामुळे सांडपाणी साचून राहत आहे. त्यामुळे परिसरात घाण, चिखल व दुर्गंधी निर्माण होत असून डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लहान मुले, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

या समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाला वेळोवेळी सूचना करून गटाराचे काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे. मात्र, अद्यापही या प्रश्नावर ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

एकीकडे शासनाकडून स्वच्छता आणि नागरिकांचे आरोग्य यासाठी विविध योजना राबविल्या जात असताना, गिरवीतील दलित वस्तीत मात्र मूलभूत स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने या ठिकाणी पाहणी करून अपूर्ण बंदिस्त गटाराचे काम पूर्ण करावे आणि साचलेली घाण व सांडपाण्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा प्रश्न आणखी गंभीर होण्यापूर्वी ग्रामपंचायत प्रशासन जागे होणार का? असा सवालही स्थानिक नागरिक उपस्थित करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या