सह्याद्रीच्या वाघाला, साताऱ्याच्या क्रांतिसिंहाला भीम आर्मी संघटनेकडून अभिवादन



फलटण | प्रतिनिधी ,दि.३-: क्रांतिकारक विचारांनी ब्रिटिश सत्तेची झोप उडवणारे, सातारा जिल्ह्यात प्रतिसरकार (पत्री सरकार) स्थापन करून स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा देणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त ३ ऑगस्ट रोजी भीम आर्मी संघटनेच्या वतीने फलटण येथील मुख्य चौकातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


यावेळी उपस्थित मान्यवरांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये देशभक्तीची प्रखर भावना होती. परकीय सत्तेविषयी असलेल्या तीव्र चीडीतून त्यांनी तलाठी पदाची नोकरी सोडून स्वतःला पूर्णपणे स्वातंत्र्यलढ्यासाठी वाहून घेतले.


सातारा–सांगली परिसरातील सुमारे १,५०० गावांमध्ये प्रतिसरकार उभारून त्यांनी ब्रिटिश राजवटीला मोठे आव्हान दिले. त्यांच्या धाडसी नेतृत्वामुळे स्वातंत्र्यलढा अधिक बळकट झाला. त्यांच्या प्रभावी भाषणांमुळे आणि जाज्वल्य राष्ट्रप्रेमामुळे अनेक युवक स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झाले. जनतेने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना "क्रांतिसिंह" आणि "पाटील" ही मानाची बिरुदे बहाल केली.


शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य जनतेची सावकारांकडून होणारी पिळवणूक रोखण्यासाठी त्यांनी कठोर भूमिका घेतली. बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठीही त्यांनी मोलाचे योगदान दिले. पुढे तुफान सेनेची स्थापना करून स्वातंत्र्य चळवळीला अधिक व्यापक आणि प्रभावी स्वरूप दिले.


यावेळी भीम आर्मी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प व्यक्त करत त्यांना विनम्र अभिवादन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या