निकृष्ट दर्जाच्या सिमेंट रस्त्यामुळे बोळेगावात संताप! ग्रामसेवक-गुत्तेदार संगनमताचा आरोप; चौकशी करून देयके रोखण्याची मागणी




बिलोली | प्रतिनिधी (विलास शेरे )

दि.३-:बिलोली तालुक्यातील बोळेगाव येथे सन २०२५-२६ योजनेअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या अंतिम टप्प्यातील सिमेंट काँक्रीट (सी.सी.) रस्त्याच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गावातील काही नागरिकांनी ग्रामसेवक आणि संबंधित गुत्तेदार यांच्या संगनमताने अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आल्याचा आरोप करत तात्काळ चौकशीची मागणी केली आहे.


जिल्हा परिषद शाळेपासून स्वस्त धान्य दुकानापर्यंत सुरू असलेल्या या रस्त्याचे काम मंजूर अंदाजपत्रकानुसार न करता, अधिकारांचा गैरवापर करून अन्य ठिकाणी करण्यात आल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे कामाच्या पारदर्शकतेवर संशय व्यक्त केला जात आहे.


तक्रारीनुसार, रस्त्याच्या कामात वापरण्यात आलेले काही सिमेंट कालबाह्य व घट्ट झालेले असल्याचा आरोप आहे. तसेच आवश्यक प्रमाणात दर्जेदार साहित्य न वापरता केवळ थातूरमातूर पद्धतीने काम उरकण्यात आल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या रस्त्याची गुणवत्ता आणि टिकाऊपणा याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.


याशिवाय, संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता किंवा कनिष्ठ अभियंत्यांनी कामाची प्रत्यक्ष पाहणी न केल्याने आणि गुत्तेदाराला पाठिशी घातल्याचा आरोप होत असल्याने गावात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.


या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी गुत्तेदारावर कठोर कारवाई करावी तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित कामाचे कोणतेही देयक अदा करू नये, अशी मागणी बोळेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार विनोद वाघमारे यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती बिलोली यांना दिलेल्या लेखी निवेदनातून केली आहे.


(टीप : वरील वृत्त हे निवेदनातील आरोपांवर आधारित असून संबंधित विभाग किंवा गुत्तेदार यांची भूमिका उपलब्ध झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या