श्रीरामपूर | प्रतिनिधी,दि.३ -: आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या विराट मोर्चाच्या नियोजनासंदर्भात माहिती देण्यासाठी श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान ज्येष्ठ आंबेडकरी नेते अशोक रामचंद्र गायकवाड (वय ७२) यांना अचानक अस्वस्थता आली. व्यासपीठावरच ते कोसळले. उपस्थितांनी तातडीने वैद्यकीय मदत करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली. उपस्थितांच्या म्हणण्यानुसार, "जय भीम" हा त्यांचा अखेरचा उच्चार होता.
अहिल्यानगर जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील एक प्रभावी आणि संघर्षशील नेतृत्व म्हणून अशोक गायकवाड यांची ओळख होती. सामाजिक न्याय, दलित हक्क आणि वंचित समाजाच्या प्रश्नांसाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला. दलित पँथर चळवळीसह विविध सामाजिक आंदोलनांमध्ये त्यांनी सक्रिय भूमिका बजावत हजारो कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली.
आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधातील आंदोलनाचे नियोजन करत असतानाच त्यांचे निधन झाल्याने राज्यभरातील आंबेडकरी चळवळीवर शोककळा पसरली आहे. अखेरच्या क्षणापर्यंत समाजाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या या लढवय्या नेत्याने संघर्षाच्या रणांगणातच अखेरचा श्वास घेतल्याची भावना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
त्यांच्या निधनामुळे अहिल्यानगरसह संपूर्ण राज्यातील सामाजिक न्याय आणि आंबेडकरी चळवळीचे मोठे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया विविध सामाजिक, राजकीय व आंबेडकरी संघटनांकडून व्यक्त होत असून, सर्व स्तरातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज