बिलोली | प्रतिनिधी - विलास शेरे ,दि.४-:"एक तेजस्वी विचारसूर्य, तर एक लोकशाहीराची लेखणी, विचारांच्या प्रेरणेने सजली आजची ही व्यासपीठाची देखणी... या महान युगात्म्यांना आदराने करूया वंदन, त्यांच्या स्मृतीस नम्रपणे अर्पूया हे शब्दसुमन!"
पीएम श्री भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श केंद्रीय प्राथमिक शाळा, अटकळी येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर उपस्थितांनी लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी दोन्ही महापुरुषांच्या जीवनकार्य, राष्ट्रसेवा, समाजप्रबोधन आणि त्यांच्या विचारांचा प्रेरणादायी वारसा यावर मनोगते व्यक्त केली. शिक्षकांनीही त्यांच्या कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांवर चालण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला केंद्रप्रमुख श्री. राघवेन्द्र काळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. मारोती पोलकमवाड, मुख्याध्यापक श्री. डी. एन. कलेटवाड, शाळेतील सर्व शिक्षकवृंद, गावातील प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ व्यक्ती, शालेय पोषण आहार कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे वातावरण देशभक्ती, समाजजागृती आणि महापुरुषांच्या विचारांच्या प्रेरणेने भारावून गेले होते. उपस्थितांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि आदर्श व्यक्तिमत्त्वांचा वारसा जपण्याची प्रेरणा मिळत असल्याचे मत व्यक्त केले.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज