फलटण शहरातील दिवाबत्तीचे विकास काम तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवावर? 'कमिशन'चा मलिदा अन् घाईघाईत केलेले उद्घाटन; नगरपालिकेच्या निकृष्ट कामामुळे वीजेचा खांब कोसळून दोन शेतकरी गंभीर जखमी!

 

फलटण (प्रतिनिधी): दिनांक 26 जुलै 2026,

पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय चमकोगिरी आणि 'कमिशन'च्या हट्टातून केलेल्या घाईघाईतील कामाचा फटका अखेर निष्पाप नागरिकांना बसला आहे. फलटण शहरात उघड्या डोळ्यांनी दिसणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा भीषण नमुना आज पुन्हा एकदा समोर आला. रविवारी बाजाराच्या दिवशी गजबजलेल्या वातावरणात फलटण शहरातील नवनिर्मित दिवाबत्तीचा (लाइटचा) खांब थेट रस्त्यावर कोसळल्याने भाजीपाला विक्रीसाठी आलेल्या एका महिला व एका पुरुष शेतकऱ्यासह दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

काही दिवसांपूर्वीच, म्हणजेच १८ जुलै रोजी याच रस्त्यावरील नवनिर्मित लाईटच्या खांबात करंट उतरून एका मूक प्राण्याचा (गाढवाचा) जागेवरच तडफडून मृत्यू झाला होता. त्या घटनेतून कोणताच धडा न घेता प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. आज रविवारी संपूर्ण फलटण तालुका आणि ग्रामीण भागातून शेतकरी व नागरिक आठवडी बाजारासाठी शहरात आले असताना, ऐन गर्दीच्या ठिकाणी हा भव्य विद्युत खांब कोसळला. सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला तरी दोन गरीब शेतकऱ्यांना आपला जीव धोक्यात घालावा लागला आहे.

सत्ताधाऱ्यांची चमकोगिरी अन् टक्केवारीची चर्चा!

पालखी सोहळ्यापूर्वी श्रेय लाटण्यासाठी आणि कामाचा दिंडोरा पिटण्यासाठी फलटण नगरपालिकेतील भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) सत्ताधाऱ्यांनी या अपूर्ण अन् निकृष्ट कामाचे घाईघाईत उद्घाटन उरकून घेतले. मात्र, आजच्या या घटनेने सत्ताधाऱ्यांचे पितळ उघडे पडले आहे. पालिका अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यातील 'संगनमत' आणि 'टक्केवारी'च्या चक्रात कामाचा दर्जा अत्यंत सुमार राहिल्याचा थेट आरोप आता तालुकाभरातून केला जात आहे.

नगरपालिका जबाबदारी स्वीकारणार का?

विकासकामांच्या नावाखाली सुरू असलेला हा जीवघेणा खेळ आता सर्वसामान्यांच्या जीवावर बेतू लागला आहे. या दुर्घटनेनंतर फलटण शहरासह संपूर्ण तालुक्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत:

नगरपालिका जबाबदारी घेणार का? निष्पाप शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या घटनेची फलटण नगरपालिका प्रशासकीय व नैतिक जबाबदारी स्वीकारणार का? गंभीर जखमी झालेल्या त्या महिला व पुरुष शेतकऱ्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च आणि योग्य आर्थिक भरपाई कंत्राटदार देणार का?

कंत्राटदारावर गुन्हा दाखल होणार का? निकृष्ट काम करणाऱ्या त्या भ्रष्ट कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून त्याच्यावर व निष्काळजी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का?

आजच्या या दुर्घटनेमुळे फलटण नगरपालिकेचा हद्दीतील विकासाचा कारभार पूर्णपणे वेशीवर टांगला गेला असून, दोषींवर तात्काळ कडक कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी फलटण तालुकावासीयांमधून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या