धडाकेबाज कारवाई! अमळनेरात सराईत गुन्हेगाराची पोलिसांनी काढली 'वरात'; गांधलीपुरा परिसरात गुंडांचे धाबे दणाणले

 



प्रतिनिधी विशाल मैराळे

अमळनेर,दि.२६-:अमळनेर शहरातील गांधलीपुरा परिसरात दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगारा विरोधात अमळनेर पोलिसांनी शुक्रवारी धडाकेबाज कारवाई केली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखाली सराईत गुन्हेगार राजेश एकनाथ निकुंभ (उर्फ दादू धोबी) याला त्याच्या घरातून ताब्यात घेऊन गांधलीपुरा पोलीस चौकी पर्यंत पायी चालवत आणण्यात आले. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला असून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, राजेश निकुंभ याच्यावर यापूर्वी खुनाचा प्रयत्न (कलम ३०७) यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो सध्या जामिनावर बाहेर असतानाही परिसरात चाकूचा धाक दाखवणे, नागरिकांना धमकावणे, मारहाण करणे आणि लूटमारी सारख्या प्रकारांत सक्रिय असल्याच्या तक्रारी सातत्याने पोलिसांकडे येत होत्या. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.


नागरिकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी शुक्रवारी सकाळी सुमारे ११ वाजता पोलीस पथकासह त्याच्या घरावर छापा टाकला. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन कोणत्याही वाहनाचा वापर न करता भर रस्त्यातून पायी चालवत गांधलीपुरा पोलीस चौकी पर्यंत आणण्यात आले. या कारवाई मुळे परिसरात गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक असल्याचा ठोस संदेश गेला.


पोलीस चौकीत आणल्या नंतर राजेश निकुंभ याची सखोल झडती घेण्यात आली. या झडती दरम्यान त्याच्याकडे कोणतेही हत्यार किंवा संशयास्पद साहित्य आढळून आले नाही. मात्र, पोलिसांनी त्याला कायद्याचे पालन करण्याबाबत कडक समज देत पुन्हा अशा प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यां मध्ये सहभागी झाल्यास अधिक कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा दिला.


अमळनेर पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे गांधलीपुरा परिसरातील नागरिकांनी स्वागत केले आहे. परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचा संदेश या कारवाईतून गेला असून, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर पोलिसांचा धाक कायम राहील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या