बारामतीतील पाझर तलाव व बंधारे भरण्याची मागणी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकाऱ्यांचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन



बारामती | प्रतिनिधी

दि.२८-:बारामती तालुक्यातील चिरायत भाग, सुपा परगणा, मोरगाव आणि लोणी भापकर परिसरात यंदा अपेक्षेपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने भविष्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन छोटे-मोठे पाझर तलाव तसेच करा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे तातडीने भरून देण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.


यासंदर्भात माननीय उपविभागीय अधिकारी, बारामती विभाग यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सध्या निरा नदी व भीमा नदी भरून वाहत असून उपलब्ध पाण्याचा योग्य नियोजनबद्ध वापर करून जाणाई–शिरसाई योजना तसेच पुरंदर उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्यात यावे. या पाण्याद्वारे बारामतीच्या चिरायत भागातील पाझर तलाव आणि करा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरल्यास भूजल पातळीत वाढ होऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.


पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधताना भविष्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी आतापासूनच आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे नमूद केले. तसेच पाण्याचे प्रभावी नियोजन केल्यास शेती, पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठीही मोठा फायदा होईल, असे निवेदनात म्हटले आहे.


या निवेदनावर हनुमंत भापकर, बाळासाहेब शिंदे (शिवसेना उपजिल्हाप्रमुख), दत्तात्रय तुकाराम लोणकर (शिवसेना वाहतूक सेना उपजिल्हाप्रमुख), निखिल देवकाते (युवासेना तालुकाप्रमुख), सर्वेश वाघ (शहरप्रमुख) आणि दादा दळवी (शाखाप्रमुख) यांच्या स्वाक्षऱ्या असून प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या