विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली, दि. २५ : नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाल्याचा दावा करण्यात येत असून, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.
कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतर-मंतर येथे अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला देशभरातील विद्यार्थी, युवक तसेच विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत होता. आंदोलनकर्त्यांनी नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची ठाम मागणी केली होती.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनीही धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुमारे २६ दिवस उपोषण केल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या आंदोलनामुळेही या प्रश्नाकडे देशभराचे लक्ष वेधले गेले.
याच काळात कॉकरोच जनता पार्टीने संसदेवर काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी केलेल्या लाठीमारात अनेक विद्यार्थी जखमी झाले. या घटनेचे देशभरातून तीव्र पडसाद उमटले असून विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रांतून आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळू लागला.
आंदोलनाच्या वाढत्या तीव्रतेमुळे आणि जनमताच्या दबावामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. या घडामोडीनंतर आंदोलनकर्त्यांनी याला विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.


0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज