फलटण | प्रतिनिधी
दि.२६-:
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे गुणवरे येथे दूध काढण्याच्या मशीनमधून विजेचा शॉक लागल्याने २८ वर्षीय विवाहित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या दुर्घटनेमुळे गुणवरे गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंका तानाजी कर्णे (वय २८, रा. गुणवरे) या नेहमीप्रमाणे आपल्या पती तानाजी कर्णे यांच्यासोबत गोठ्यात म्हशीचे दूध काढण्यासाठी गेल्या होत्या. दूध काढण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर मशीनला जोडलेल्या कॅनचे झाकण काढून ते विद्युत बोर्डाजवळ ठेवत असताना अचानक त्यांना जोरदार विजेचा शॉक बसला.
प्रियंका यांच्या आरडाओरड्याने गोठ्यात एकच धावपळ उडाली. पती तानाजी कर्णे यांनी तत्काळ धाव घेत त्यांना विजेच्या संपर्कातून बाजूला केले. मात्र तोपर्यंत त्या बेशुद्ध झाल्या होत्या.
यानंतर नातेवाईकांच्या मदतीने त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर रात्री सुमारे ८.३० वाजता त्यांना मृत घोषित केले.
या अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे कर्णे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज