फलटण,दि.२४ : शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका नागरिकाची ऑनलाइन आर्थिक फसवणूक केल्याची घटना फलटण शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण येथील तक्रारदार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपींनी फोन व व्हॉट्सॲपच्या माध्यमातून संपर्क साधून त्यांना शेअर मार्केट ट्रेडिंगचा चांगला अनुभव असल्याचे सांगितले. तसेच एम.टी.एफ. व शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तक्रारदारांचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर आरोपींनी विविध ट्रेडिंग अकाउंट व बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगितले. आरोपींच्या सांगण्यावरून तक्रारदारांनी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये व यूपीआयच्या माध्यमातून एकूण लाखो रुपयांची रक्कम पाठवली.
दरम्यान, तक्रारदारांच्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये मोठा नफा झाल्याचे भासवून आरोपींनी आणखी पैसे भरण्यास प्रवृत्त केले. मात्र, पैसे परत मागितल्यानंतर मार्जिन भरणे, ट्रेडिंग पोझिशन रिलीज करणे अशा विविध कारणांचा बहाणा करून रक्कम परत केली नाही.
या प्रकारात आरोपींनी संगनमत करून खोटी माहिती व मोठ्या नफ्याचे आमिष दाखवत तक्रारदारांची लाखो रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.
याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर तपास सुरू
सदर गुन्ह्यात आरोपींनी वापरलेले मोबाईल क्रमांक, बँक खाते क्रमांक, यूपीआय व्यवहार व संबंधित आर्थिक व्यवहारांची माहिती पोलिसांकडून तपासली जात आहे. फसवणुकीची रक्कम ज्या खात्यांमध्ये वर्ग झाली आहे त्या खात्यांचा तसेच संबंधित आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. घुनशाम बल्लाळ करीत आहेत.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
नागरिकांनी अनोळखी व्यक्तींच्या सांगण्यावरून शेअर मार्केट ट्रेडिंग, ऑनलाइन गुंतवणूक किंवा कमी वेळेत मोठा नफा मिळवून देण्याच्या आमिषाला बळी पडू नये.
कोणत्याही अनोळखी व्यक्तीला ओटीपी, पॅनकार्ड, आधारकार्ड, बँक खात्याची माहिती किंवा वैयक्तिक कागदपत्रे देऊ नयेत.
ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यास त्वरित सायबर हेल्पलाइन क्रमांक 1930 वर संपर्क साधावा तसेच जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी.


0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज