बेकायदेशीर स्फोटक साठ्यावर फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; 24लाख72 हजाराचा मुद्देमाल जप्त


फलटण, दि. 30 जुलै 2026 : फलटण तालुक्यातील मौजे बरड येथील रांजणी पुनर्वसन परिसरात बेकायदेशीररीत्या स्फोटके साठवून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर फलटण ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत सुमारे रु. 24 लाख 72 हजार 001/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 29 जुलै 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7:50 वाजण्याच्या सुमारास मौजे बरड येथील रांजणी पुनर्वसन परिसरातील बंद मराठी शाळेसमोरील मैदानात उभ्या असलेल्या एका ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर स्फोटके साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती फलटण ग्रामीण पोलिसांना प्राप्त झाली होती.

माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत एमएच 11 सीएच 2555 क्रमांकाच्या ट्रकची तपासणी केली. तपासणीदरम्यान कोणताही वैध परवाना नसताना आणि लोकवस्तीच्या ठिकाणी मानवी जीवितास धोका निर्माण होईल अशा निष्काळजीपणे स्फोटके साठवून ठेवल्याचे निदर्शनास आले.

या कारवाईत पोलिसांनी Ecoprime 83 mm चे 500 बॉक्स आणि Superpower 90 चे 4 बॉक्स, असे एकूण 504 बॉक्स स्फोटके तसेच संबंधित ट्रक असा सुमारे रु. 24.72 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 454/2026 अन्वये स्फोटके अधिनियम 1884 चे कलम 9(B)1(B), स्फोटके अधिनियम 1908 चे कलम 5 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 288 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील आरोपी पुढीलप्रमाणे :

शंकरलाल बेनीराम जाट, रा. बरड, ता. फलटण

हेमराज महावीर जाट, मूळ रा. भिलवाडा, राजस्थान, सध्या रा. बरड, ता. फलटण (अटक)

सदर कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे आणि पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या