सोनकसवाडी (बारामती) : बारामती तालुक्यातील सोनकसवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध मुरूम उत्खनन व वाहतूक सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. परिसरातील माळरान आणि चिरायती जमिनींमधून मुरूमाचे उत्खनन करून त्याची वाहतूक केली जात असल्याने पर्यावरणीय हानी होत असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सोनकसवाडी परिसर हा सुमारे ५० टक्के बागायती आणि ५० टक्के जिरायती क्षेत्राचा समावेश असलेला भाग आहे. याच परिसरातून नवीन रेल्वे महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू असून, या कामाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात मुरूमाची गरज निर्माण झाली आहे. याचा फायदा घेत काही जणांकडून नियमांना हरताळ फासून अवैध उत्खनन सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक ठिकाणी माळरान फोडून मुरूम काढला जात असून दिवस-रात्र डंपर च्या माध्यमातून वाहतूक केली जात आहे. या प्रकारामुळे नैसर्गिक भूभागाचे नुकसान होत असून भविष्यात पर्यावरणीय समतोल बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या या कथित अवैध व्यवसायाकडे महसूल विभाग व स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही ग्रामस्थांकडून केला जात आहे. "या मुरूम व्यावसायिकांना नेमके अभय कोणाचे आहे?" असा सवाल नागरिकांमध्ये चर्चिला जात असून संबंधित यंत्रणांनी तातडीने तपास करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
वंचित बहुजन न्यूज च्या माध्यमातून सोनकसवाडीतील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे अवैध मुरूम उत्खनन व वाहतुकीची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आता या प्रकरणात प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते आणि अवैध उत्खननाविरोधात कोणती कारवाई करतात, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज