सातारा | प्रतिनिधी
दि.१३-एस.सी. प्रवर्गाच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण तातडीने थांबविण्यात यावे, तसेच अनुसूचित जातींच्या विकासासाठी विविध प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी आरक्षण बचाव समिती, सातारा यांच्या वतीने सोमवार दि. १५ जून रोजी वडूज (ता. खटाव) येथील तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत हे आंदोलन चालणार असल्याची माहिती समितीचे कार्यकर्ते सुनील कदम यांनी दिली.
समितीच्या निवेदनानुसार, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणाची तरतूद करताना केवळ एका जातीचा विचार न करता अनेक सामाजिकदृष्ट्या वंचित आणि शोषित जातींना एकत्रित करून अनुसूचित जाती (एस.सी.) हा स्वतंत्र प्रवर्ग निर्माण केला. या प्रवर्गात राज्यातील सुमारे ५९ जाती व उपजातींचा समावेश असून त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाचा अधिकार देण्यात आला आहे.
मात्र काही व्यक्तींनी न्यायालयात याचिका दाखल करून एस.सी. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी केली. न्यायालयाने राज्य सरकारांना उपवर्गीकरणाचे अधिकार दिले असले तरी ते सक्तीने लागू करण्याचा आदेश दिलेला नाही. त्यामुळे शासनाने घाईघाईने उपवर्गीकरणाचा निर्णय घेऊ नये, अशी भूमिका आरक्षण बचाव समितीने घेतली आहे.
समितीच्या मते, एस.सी. प्रवर्गातील बहुसंख्य ५८ जातसमूहांनी अशा प्रकारची कोणतीही मागणी केलेली नसताना संपूर्ण प्रवर्गावर अन्याय करणारे निर्णय घेऊ नयेत. आरक्षणाच्या मूळ रचनेत बदल करून ते कमकुवत करण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा इशारा समितीने दिला आहे.
यावेळी समितीने विविध मागण्याही पुढे केल्या आहेत. त्यामध्ये शासकीय व निमशासकीय विभागांतील रिक्त आरक्षण पदांचा १०० टक्के कोटा तातडीने भरणे, कंत्राटी भरती बंद करणे, खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करणे, एस.सी. प्रवर्गासाठी राखीव निधी इतरत्र वळविण्यास बंदी घालणे, जातीनिहाय जनगणना करणे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्पन्नातील १५ टक्के निधी एससी-एसटी समाजासाठी खर्च करणे, तसेच दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत भूमिहीन कुटुंबांना जमीन उपलब्ध करून देणे यांचा समावेश आहे.
तसेच राज्यातील शिक्षणाचे राष्ट्रीयीकरण करून केजी ते पीजीपर्यंतचे शिक्षण सक्तीचे, मोफत आणि दर्जेदार करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात झालेल्या बैठकीत निमंत्रक चंद्रकांत खंडाईत, दादासाहेब केंगार यांनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी बी.एल. माने, अनिल वीर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
एस.सी. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला तीव्र विरोध दर्शवित आरक्षण बचाव समितीने वडूज येथील आंदोलन यशस्वी करण्यासाठी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज