“खड्ड्यांनी हैराण फलटणकरांचा संताप उसळला! आठ दिवसांत रस्ते दुरुस्त करा, अन्यथा नगराध्यक्षांच्या दालनाला टाळे”




फलटण | प्रतिनिधी

दि.१३/०६/२०२६

फलटण शहरातील जीवघेण्या खड्ड्यांविरोधात भीम आर्मी संघटना आक्रमक झाली असून आज नगरपालिका कार्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडण्यात आले. शहर खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन देऊनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी नगरपालिका प्रशासन आणि नगराध्यक्षांविरोधात तीव्र घोषणाबाजी केली.


नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारल्यानंतर एका महिन्यात फलटण शहर खड्डेमुक्त करण्याची ग्वाही नागरिकांना दिली होती. मात्र आश्वासनाचा कालावधी संपूनही रस्त्यांची अवस्था अधिकच बिकट झाल्याने नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. शहरातील प्रमुख मार्गांसह अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून पावसामुळे ते मृत्यूचे सापळे बनल्याचा आरोप भीम आर्मीने केला आहे.


संघटनेने यापूर्वी स्मरण निवेदन देऊन प्रशासनाला इशारा दिला होता. त्या निवेदनात खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला असून शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.


आजच्या आंदोलनात भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करत तीव्र घोषणाबाजी केली. “आश्वासनांचे फक्त फुगे नकोत, खड्डेमुक्त रस्ते द्या”, “जनतेचा संयम संपत चालला आहे”, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.


यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला थेट अल्टिमेटम देत सांगितले की, “आठ दिवसांच्या आत रस्ते दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली नाही, तर भीम आर्मी संघटना नगराध्यक्षांच्या दालनाला टाळे ठोकून तीव्र जनआंदोलन उभारेल. शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या प्रशासनाला आता जाब द्यावाच लागेल.”


फलटणमधील खड्ड्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना भीम आर्मीच्या या आक्रमक भूमिकेमुळे नगरपालिका प्रशासनावर दबाव वाढला असून येत्या काही दिवसांत प्रशासन काय पावले उचलते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या