"अवैध दारूच्या अड्ड्यांवर प्रशासनाचा लोखंडी हात; साताऱ्यात दारू माफियांमध्ये खळबळ!"
सातारा | प्रतिनिधी
दिनांक १४/०६/२०२६
सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू, ताडी तसेच देशी-विदेशी मद्य विक्रीच्या अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हा पोलीस दलाने संयुक्तपणे धडक कारवाई करत दारू माफियांना मोठा दणका दिला आहे. तीन दिवस चाललेल्या विशेष मोहिमेत 14 गुन्हे दाखल करून 13 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून तब्बल 2 लाख 59 हजार 330 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक बाबासाहेब भुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली 11 ते 13 जून 2026 या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत कराड तालुक्यातील वारुंजी फाटा, हजारमाची, तासवडे तसेच खंडाळा तालुक्यातील म्हावशी परिसरात छापे टाकण्यात आले.
चार ठिकाणी छापे; आरोपींच्या ताब्यातून मोठा साठा जप्त
या कारवाईदरम्यान आरोपी अनिल कदम, राहुल पडळकर, राजू पवार आणि पंकज पाटील यांच्या ताब्यातून 90 लिटर ताडी, 53.10 बल्क लिटर देशी-विदेशी दारू आणि एक दुचाकी वाहन जप्त करण्यात आले. या कारवाईत एकूण 1 लाख 13 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
अवैध मद्यनिर्मितीवर मोठा प्रहार
विशेष मोहिमेदरम्यान संपूर्ण जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक, कराड, फलटण, वाई-महाबळेश्वर आणि सातारा विभागांनी पोलिसांच्या मदतीने संयुक्त कारवाई केली. यामध्ये 57.06 लिटर देशी दारू, 24.48 लिटर विदेशी दारू, 140 लिटर ताडी आणि हातभट्टी दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे तब्बल 2,925 लिटर रसायन जप्त करण्यात आले.
"दारू माफियांना कोणतीही माफी नाही!"
अवैध मार्गाने तयार करण्यात येणारी हातभट्टी दारू आणि बनावट ताडी नागरिकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण करत असल्याचे अनेक दुर्घटनांमधून समोर आले आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या अवैध मद्याचे सेवन टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच जिल्ह्यात कुठेही अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक किंवा विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ तक्रार नोंदवावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
तक्रार करा, नाव राहील गोपनीय
राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागरिकांसाठी टोल फ्री क्रमांक 18002339999 आणि व्हॉट्सअॅप क्रमांक 8422001133 उपलब्ध करून दिला असून तक्रारदाराचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल, असे अधीक्षक बाबासाहेब भुतकर यांनी सांगितले आहे.
उपशीर्षक :
"अवैध दारूच्या अड्ड्यांवर प्रशासनाचा लोखंडी हात; साताऱ्यात दारू माफियांमध्ये खळबळ!"


0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज