सांगली | प्रतिनिधी
दि.११/०६/२०२६
जत आणि पलूस तालुक्यातील शेकडो नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शासनाकडून मोफत मिळणाऱ्या गृह उपयोगी भांडी संच, सुरक्षा साहित्य व अत्यावश्यक संच वितरणामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित वितरण एजंट किरण दळवी यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, सांगली जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत कामगारांना विविध कल्याणकारी योजनांअंतर्गत मोफत साहित्य दिले जाते. या साहित्याच्या वितरणाची जबाबदारी मफतलाल कंपनीमार्फत खासगी एजंट किरण दळवी यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र, वितरण प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जत व पलूस तालुक्यातील शेकडो कामगारांनी १३, १८ आणि २० मार्च २०२६ रोजी नियमानुसार ऑनलाइन व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करून टोकन प्राप्त केले होते. त्यानंतरही तब्बल तीन महिने उलटून गेले तरी संबंधित कामगारांना त्यांच्या हक्काचे साहित्य मिळालेले नाही. वारंवार विचारणा करूनही “आज देतो, उद्या देतो” अशी आश्वासने देऊन कामगारांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे कामगारांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, लाखो रुपयांच्या साहित्य वितरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संबंधित एजंट, कंत्राटदार आणि जबाबदार घटकांवर फसवणूक, विश्वासघात, अपहार तसेच संगनमताचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
या संदर्भात युनियनच्या शिष्टमंडळाने सहाय्यक कामगार आयुक्त निलेश येलगुडे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. यावेळी येलगुडे यांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तातडीने चौकशी करून दोषींवर आवश्यक ती कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती युनियनकडून देण्यात आली.
युनियनच्या प्रमुख मागण्या
संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.
संबंधित एजंट व कंत्राटदारावर BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा.
पात्र कामगारांना तात्काळ साहित्य वितरित करण्यात यावे.
आर्थिक गैरव्यवहाराचा सखोल तपास करून दोषींवर कारवाई करण्यात यावी.
संपूर्ण वितरण प्रक्रियेचे स्वतंत्र लेखापरीक्षण करण्यात यावे.
युनियनने प्रशासनाला स्पष्ट इशारा देत सांगितले आहे की, तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल. तसेच या प्रकरणामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे, सांगली जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे, जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष जगदिश कांबळे, जिल्हा महासचिव अनिल मोरे, जिल्हा उपाध्यक्ष किशोर आढाव, युवा जिल्हाध्यक्ष सुमेध माने, सम्यक विद्यार्थी आंदोलनचे जिल्हाध्यक्ष शिवाजी उर्फ पवन वाघमारे, उपाध्यक्ष मोहन साबळे, मनपा क्षेत्र अध्यक्ष युवराज कांबळे, सांगली शहर अध्यक्ष संगाप्पा शिंदे, मिरज शहर अध्यक्ष असलम मुल्ला, कुपवाड शहर अध्यक्ष बंदेनवाज राजरतन, विशाल कांबळे, प्रकाश शिवशरण यांच्यासह मोठ्या संख्येने पीडित बांधकाम कामगार उपस्थित होते.
कामगारांच्या कल्याणासाठी असलेल्या योजनांमध्येच गैरव्यवहार होत असल्याच्या आरोपामुळे सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली असून, या प्रकरणातील सत्य बाहेर येण्यासाठी आणि दोषींवर कठोर कारवाईसाठी आता सर्वांचे लक्ष प्रशासनाच्या भूमिकेकडे लागले आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज