नागेवाडीतील अनधिकृत सभामंडपाविरोधात युथ पँथर आक्रमक; आमरण उपोषण सुरू

"सभामंडपाची मंजुरी तात्काळ रद्द करा, अन्यथा जनआंदोलन उभे करू" – अक्षय कांबळे



सातारा | प्रतिनिधी

दि.११/०६/२०२६

सातारा तालुक्यातील नागेवाडी येथे सार्वजनिक रस्त्यावर प्रस्तावित करण्यात आलेल्या कथित अनधिकृत सभामंडपाच्या विरोधात युथ पँथर संघटना आक्रमक झाली असून, सभामंडपाची मंजुरी तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी संघटनेच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास व्यापक जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा युथ पँथरचे नेते अक्षय कांबळे यांनी दिला.


यावेळी आकाश संजय सावंत, संदीप जाधव (गुणरत्न मावळा), विजय तानाजी सावंत, अक्षय संजय सावंत यांच्यासह अनेक कार्यकर्ते आंदोलनस्थळी उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांनी रस्ता क्रमांक २३ वरील जागा ही सार्वजनिक वाहतुकीसाठी राखीव असताना त्या ठिकाणी सभामंडप उभारण्यास मंजुरी दिल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.


उपोषणकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात रस्त्याच्या जागेवर सभामंडपाला मंजुरी देणाऱ्या अधिकारी व जबाबदार व्यक्तींवर चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण तातडीने हटवून नागरिकांसाठी रस्ता खुला करावा आणि संपूर्ण प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी करून अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.


याशिवाय सरकारी कामाच्या भूमिपूजनावेळी कथित अघोरी पद्धतीचा अवलंब करून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून, संबंधित व्यक्तीची सखोल चौकशी करून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.


दरम्यान, युथ पँथर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर कथित जातीवाचक टीका झाल्याचा आरोप करत संबंधित दोषींवर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.


उपोषणकर्त्यांनी प्रशासनाला इशारा देताना सांगितले की, उपोषणादरम्यान आंदोलनकर्त्यांच्या जीवितास कोणताही धोका निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित अधिकारी आणि प्रशासनाची राहील.


या संदर्भातील निवेदनाच्या प्रती सार्वजनिक बांधकाम विभाग सातारा, महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री, तालुका पोलीस निरीक्षक सातारा, पंचायत समिती सातारा, पंचायत समिती सभापती तसेच शहर पोलीस स्टेशन सातारा यांना देण्यात आल्या आहेत.


आंदोलनस्थळी भेट देऊन वंचित बहुजन आघाडीचे नेते चंद्रकांत खंडाईत, गणेश कारंडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष मदन (बापू) खंकाळ, सामाजिक कार्यकर्ते अनिल वीर तसेच ॲड. विलास वहागावकर यांनी उपोषणकर्त्यांना जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे नागेवाडीतील सभामंडपाचा वाद अधिकच तापण्याची चिन्हे दिसत असून प्रशासनाची भूमिका काय राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या