कवितेतून सामाजिक प्रबोधनाचा जागर; कवी शाम बैसाणे यांच्या अध्यक्षतेखाली रंगले कवी संमेलन




कल्याण | प्रतिनिधी,दि.१४-:कवी कट्टा कल्याण मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले सामाजिक प्रबोधनपर कवी संमेलन गुलमोहर कॉलनी, विजयनगर, कल्याण (पूर्व) येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. ज्येष्ठ कवी शाम बैसाणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनात समाजजागृती, मानवता, शिक्षण, समता आणि सामाजिक परिवर्तन या विषयांवर दर्जेदार कवितांचे सादरीकरण करण्यात आले.


कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अशोक भवार उपस्थित होते. तसेच कवी कट्टा कल्याण मुंबईचे अध्यक्ष नवनाथ रणखांबे आणि सार्थक साहित्य प्रकाशनच्या प्रकाशिका प्रा. आशा रणखांबे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.


संमेलनात सहभागी कवींनी आपल्या प्रभावी कवितांमधून सामाजिक प्रश्नांवर भाष्य करत उपस्थितांना विचारप्रवृत्त केले. समाजातील अंधश्रद्धा, अन्याय, विषमता, शिक्षणाचे महत्त्व तसेच मानवी मूल्ये जपण्याचा संदेश कवितांद्वारे देण्यात आला. रसिकांनीही कवितांना उत्स्फूर्त दाद देत कार्यक्रमाची शोभा वाढवली.


अध्यक्षीय मनोगतात कवी शाम बैसाणे यांनी साहित्य हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगत, कवी आणि साहित्यिकांनी सामाजिक बांधिलकी जपत लेखन करणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी कवी कट्टा कल्याण मुंबईच्या कार्याचे कौतुक केले.


सामाजिक प्रबोधनाचा संदेश देणारे हे कवी संमेलन साहित्यप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या