माळेगाव पोलिसांची दमदार कामगिरी! हरवलेले ७ मोबाईल शोधून १.५६ लाखांचा मुद्देमाल मालकांच्या ताब्यात

सायबर कौशल्याच्या जोरावर नागरिकांना दिला दिलासा; माळेगाव पोलिसांचे सर्वत्र कौतुक



बारामती | प्रतिनिधी

दिनांक १४/०६/२०२६

पुणे ग्रामीण जिल्ह्यातील माळेगाव पोलीस ठाण्याने उत्कृष्ट तपासकौशल्य आणि तांत्रिक विश्लेषणाच्या बळावर हरवलेले तब्बल ७ मोबाईल फोन शोधून काढत १ लाख ५६ हजार ५८५ रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत केला आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून माळेगाव पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.



पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली हरवलेल्या वस्तू शोध मोहिमेअंतर्गत माळेगाव पोलीस ठाण्याने प्राप्त तक्रारींचे बारकाईने तांत्रिक विश्लेषण केले. यामध्ये गोपनीय शाखेचे पोलीस नाईक ज्ञानेश्वर सानप यांनी महत्त्वाची भूमिका बजावत विविध ठिकाणी शोधमोहीम राबवून हरवलेले मोबाईल हस्तगत केले.



पोलिसांनी परत मिळवून दिलेल्या मोबाईलमध्ये विविध कंपन्यांचे महागडे स्मार्टफोन असून त्यांची एकूण किंमत १,५६,५८५ रुपये इतकी आहे. संबंधित नागरिकांचे हरवलेले मोबाईल शोधून त्यांना परत देण्यात आले.

शनिवार, दि. १३ जून २०२६ रोजी माळेगाव पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात मोबाईल मालकांना त्यांचे फोन परत देण्यात आले. हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करत माळेगाव पोलिसांचे आभार मानले.



ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश इंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माळेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी कुलदीप संकपाळ यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.



हरवलेल्या वस्तू शोधून नागरिकांच्या ताब्यात देण्याच्या या उपक्रमामुळे पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. गुन्हे प्रतिबंधाबरोबरच नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज असल्याचे या कारवाईतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या