फलटण तहसीलच्या 'सेतू' केंद्रात नागरिकांचे भर उन्हात हाल! प्रशासन नागरिकांना छताखाली सुविधा देणार का ? प्रशासनाला नागरिकांचा संतप्त सवाल?

 


फलटण (प्रतिनिधी): दिनांक 15 जून 2026,

भीषण उन्हाळा आणि वाढता कडाका असूनही फलटण तहसील कार्यालय परिसरातील 'सेतू नागरिक सुविधा केंद्राबाहेर' नागरिकांना उघड्यावर, थेट उन्हात उभे राहावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छायाचित्रात स्पष्ट दिसत आहे की, शेकडो नागरिक अत्यंत अपुऱ्या जागेत, कोणत्याही सावलीशिवाय खिडकीबाहेर गर्दी करून उभे आहेत. 'डिजिटल इंडिया' आणि 'गतिमान प्रशासनाचा' डांगोरा पिटणाऱ्या प्रशासनाला या गरीब नागरिकांना साधे एक छप्पर किंवा सावलीची सोय करून देता आली नाही का, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.

 तरुणांसह ,वृद्ध आणि महिलांचे प्रचंड हाल; 

सध्या विविध शासकीय योजना, शिधापत्रिका (रेशन कार्ड) आणि शैक्षणिक कामांसाठी लागणाऱ्या दाखल्यांची मोठी लगबग सुरू आहे. यासाठी तालुक्यातील ग्रामीण भागातून शेकडो सर्वसामान्य शेतकरी, महिला आणि वृद्ध नागरिक पहाटेपासूनच सेतू केंद्राबाहेर चकरा मारत आहेत. मात्र, या केंद्राबाहेर नागरिकांना बसण्यासाठी ना बाकांची व्यवस्था आहे, ना उन्हापासून बचावासाठी शेड (छत) उभारण्यात आले आहे. भर उन्हात घामाघूम होऊन, एकमेकांना ढकलत नागरिकांना दाखल्यांसाठी कसरत करावी लागत आहे. ही नागरिकांची सुविधा आहे की प्रशासनाकडून सुरू असलेली छळवणूक, अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

प्रशासनाला आमचे थेट सवाल:

तालुक्यातील जनतेकडून कोट्यवधी रुपयांचा महसूल गोळा करणाऱ्या प्रशासनाला सेतू केंद्राबाहेर एक साधे पत्र्याचे शेड किंवा मंडप उभारता येत नाही का?

वृद्ध, महिला आणि लहान मुलांना तासनतास उन्हात उभे ठेवताना अधिकाऱ्यांना लाज वाटत नाही का?

वाढती गर्दी पाहता तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त खिडक्या आणि टोकन पद्धत का सुरू केली जात नाही?

नागरिकांचा इशारा: तातडीने सोयी न झाल्यास आंदोलनाचा पवित्रा

तहसील प्रशासनाने एसी केबिनमधून बाहेर पडून या सेतू केंद्राची दुरवस्था आणि नागरिकांचे हाल उघड्या डोळ्यांनी बघावेत. येत्या दोन ते तीन दिवसांत जर या ठिकाणी नागरिकांना छताखाली बसण्याची, पिण्याच्या पाण्याची आणि सावलीची योग्य सुविधा उपलब्ध करून दिली नाही, तर लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संतप्त नागरिकांनी  तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या