बारामती,दि.१४- : बारामतीच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरलेल्या राज्यस्तरीय पेंच्याक सिलाट स्पर्धेत योद्धा स्पोर्ट्स अकॅडमीची अवघ्या 11 वर्षांची खेळाडू ईश्वरी सम्राट मोरे हिने दमदार कामगिरी करत प्री-टेन 26 ते 28 किलो वजनी गटात रौप्यपदक (सिल्व्हर मेडल) पटकावले आहे.
पुणे ग्रामीण संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ईश्वरीने राज्यभरातून आलेल्या बलाढ्य आणि अनुभवी खेळाडूंविरुद्ध निर्भयपणे सामना करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. तिच्या जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि कठोर मेहनतीच्या बळावर तिने राज्यस्तरावर बारामतीचे नाव उज्ज्वल केले.
या यशामागे प्रशिक्षक साहेबराव ओहोळ सर यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि योद्धा स्पोर्ट्स अकॅडमीतील नियमित सरावाचा मोठा वाटा असल्याचे मानले जात आहे. लहान वयातच मिळवलेल्या या यशामुळे ईश्वरीने भविष्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी आपली दावेदारी मजबूत केली आहे.
ईश्वरीच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अकॅडमीचे पदाधिकारी, कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच बारामती परिसरातील नागरिकांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भविष्यातही ती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र व देशाचे नाव उंचावेल, असा विश्वास तिच्या प्रशिक्षकांनी व्यक्त केला.
अवघ्या 11 व्या वर्षी राज्यस्तरावर रौप्यपदक पटकावत ईश्वरी मोरेने बारामतीच्या क्रीडा विश्वात नवा आदर्श निर्माण केला आहे.


0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज