होलार समाज नेते नंदकुमार केंगार यांच्यावरील कारवाईची चौकशी करा; पुरोगामी होलार संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन



अनिल वीर 

सातारा,दि.२३-:होलार समाजाचे नेते तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अठावले गट) चे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष नंदकुमार केंगार यांच्यावरील कथित अन्यायकारक कारवाईची निष्पक्ष चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पुरोगामी होलार संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्याशी चर्चा करून निवेदन सादर करण्यात आले.


निवेदनात म्हटले आहे की, अकलूज (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील आंबेडकरी चळवळीतील अग्रगण्य कार्यकर्ते नंदकुमार केंगार यांच्या निवासस्थानी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दौंड विभागातील अधिकाऱ्यांनी छापा टाकला. त्यावेळी घरात केवळ त्यांच्या सुनबाई एकट्या असताना त्यांच्याशी अर्वाच्य भाषेत वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.


संघटनेच्या म्हणण्यानुसार, संबंधित अधिकाऱ्यांकडे कारवाईसाठी कोणतेही लिखित आदेश किंवा वॉरंट नव्हते. तसेच छाप्यामध्ये कोणतेही अवैध साहित्य आढळून आले नसतानाही ही कारवाई करण्यात आली. हा प्रकार केंगार यांची सामाजिक प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.


या घटनेमुळे केंगार कुटुंबीयांना मानसिक त्रास सहन करावा लागला असून समाजामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल, पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.


पुरोगामी होलार संघटना ही सामाजिक न्याय, संविधानिक मूल्ये आणि समाजाच्या स्वाभिमानासाठी कार्यरत असून अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणे ही संघटनेची सामाजिक बांधिलकी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने चौकशीचे आदेश द्यावेत, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.


यावेळी राज्य उपाध्यक्ष सतीश माने, जिल्हा संघटक मकरंद केंगार, भरत मदने, वंचितचे जिल्हा महासचिव दादासाहेब केंगार, चंद्रकांत खंडाईत, धम्मबंधू उत्सव समितीचे अध्यक्ष अशोक भोसले, साहित्यिक सुरेश (आबा) मुळीक, ॲड. विलास वहागावकर, अनिल वीर यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या