योगसाधनेतून शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास साध्य – प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे

छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांचे योग प्रात्यक्षिक



सातारा | प्रतिनिधी

दि.२३-:जागतिक योग दिनानिमित्त येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये योग प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांनी योगाचे महत्त्व अधोरेखित करताना, “योग ही भारतीय संस्कृतीची अमूल्य देणगी असून शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी प्रत्येकाने दैनंदिन जीवनात योगसाधनेचा अंगीकार करणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन केले.


कार्यक्रमाच्या प्रारंभी शारीरिक शिक्षण संचालक प्रा. विक्रमसिंह ननावरे यांनी प्रास्ताविकातून योगाचे महत्त्व स्पष्ट केले. यानंतर मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. मोरे म्हणाले की, आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धात्मक जीवनात वाढता ताणतणाव, मानसिक अस्वस्थता आणि आरोग्याच्या समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहेत. अशा परिस्थितीत मनःशांती, एकाग्रता आणि आरोग्य संवर्धनासाठी योग हा प्रभावी उपाय आहे.


ते पुढे म्हणाले की, योग हा केवळ व्यायामाचा प्रकार नसून तो शरीर, मन, बुद्धी आणि आत्म्याचा समतोल साधणारी जीवनपद्धती आहे. सम्यक आहार, नियमित व्यायाम, ध्यानधारणा आणि सकारात्मक जीवनशैली यांचा अंगीकार करून प्रत्येक व्यक्तीने निरोगी जीवन जगण्याचा प्रयत्न करावा.


महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठीय शिक्षणासोबतच योग प्रशिक्षण, संगीत, कला आणि क्रीडा क्षेत्रातील प्रशिक्षणालाही विशेष प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


या कार्यक्रमात उपप्राचार्य डॉ. रामराजे माने देशमुख यांनी प्राध्यापक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींकडून विविध योगासनांची प्रात्यक्षिके करून घेतली. तसेच योग दिनानिमित्त महाविद्यालयाच्या एनसीसीच्या ६२ विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक अजिंक्यतारा गडावर योगासनांचे सादरीकरण करून योगाचा संदेश दिला.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुधाकर कोळी यांनी केले, तर प्रा. तानाजी देवकुळे यांनी आभार प्रदर्शन केले.


यावेळी डॉ. धनंजय नलावडे, प्रा. संदीप भुजबळ, डॉ. शिवाजी पाटील, डॉ. धनाजी मासाळ, डॉ. हिराजी देशमुख, प्रा. गणेश लोखंडे, डॉ. अभिमान निमसे, डॉ. अभिजीत पोरे, डॉ. दत्तात्रय कोरडे, डॉ. मनोहर निकम, प्रा. रामचंद्र गाडेकर यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी तसेच ज्युनिअर महाविद्यालयातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


— योग हीच निरोगी आणि संतुलित जीवनाची गुरुकिल्ली असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या