पुणे ,२२-: धायरी परिसरातील रिलायबल केमिकल्स कंपनीच्या गोदामातून लाखो रुपयांचे ऑर्थो फॉस्फोरिक अॅसिड चोरणाऱ्या सराईत टोळीचा नांदेड सिटी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी तिघा आरोपींना अटक करत तब्बल २० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धायरी येथील कॅनॉलजवळ असलेल्या रिलायबल केमिकल्स कंपनीच्या गोदामातून २५ लिटर क्षमतेच्या ऑर्थो फॉस्फोरिक अॅसिडच्या कॅनची चोरी झाली होती. या घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली होती. याप्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच नांदेड सिटी पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेत विविध तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढला. अखेर पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली.
आरोपींकडून १५ लाख ४० हजार रुपये किमतीचे १५४ ऑर्थो फॉस्फोरिक अॅसिडचे कॅन जप्त करण्यात आले. तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली पिकअप गाडी देखील पोलिसांनी ताब्यात घेतली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत २० लाख ४० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
या धडक कारवाईमुळे औद्योगिक केमिकल्स चोरी करणाऱ्या टोळीचा छडा लागला असून, या टोळीने यापूर्वी अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत. नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज