धावत्या एसटीला अचानक आग; बारामती आगाराच्या निष्काळजीपणावर संताप! निरा-बारामती शटल बस जळून खाक; मोठी जीवितहानी टळली, एसटी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह



बारामती | प्रतिनिधी

दिनांक १८/०६/२०२६

बारामती एसटी आगाराच्या कथित गलथान आणि निष्काळजी कारभाराचे आणखी एक धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. बारामतीहून निराकडे जाणारी शटल बस खामगाव वाडी हद्दीत निरा-बारामती मार्गावर धावत असताना अचानक बसच्या इंजिन भागातून धूर निघू लागला आणि काही क्षणांतच बसने पेट घेतल्याची घटना घडली. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखून बस तातडीने रस्त्याच्या कडेला थांबवून प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.


घटनेनंतर काही वेळातच संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आणि जळून खाक झाली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून एसटी महामंडळाच्या वाहन तपासणी प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.


स्थानिक नागरिकांच्या मते, कोणतेही वाहन आगारातून बाहेर पडण्यापूर्वी त्याची तांत्रिक तपासणी आणि सुरक्षा पडताळणी करणे बंधनकारक असते. मात्र संबंधित बसची योग्य तपासणी झाली होती का, याबाबत आता संशय व्यक्त केला जात आहे. बसमध्ये बिघाड असतानाही ती रस्त्यावर धावण्यासाठी कशी सोडण्यात आली, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.


या घटनेमुळे बारामती आगारातील देखभाल व्यवस्था, सुरक्षा मानके आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी यावर चर्चा सुरू झाली आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच सर्व एसटी बसांची विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी प्रवासी आणि नागरिकांकडून होत आहे.


दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी हा प्रकार अत्यंत गंभीर असून राज्य परिवहन महामंडळाने याची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.


"चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचे प्राण वाचले; अन्यथा ही घटना मोठ्या दुर्घटनेत रूपांतरित झाली असती," अशी प्रतिक्रिया घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या