एका रात्रीत पाच ठिकाणी दरोडे टाकणारी टोळी गजाआड! पुणे ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; 20 गंभीर गुन्हे उघड, 25 लाखांचा मुद्देमाल जप्त


दौंड | प्रतिनिधी

दिनांक १८/०६/२०२६

दौंड, बारामती आणि जुन्नर विभागात दहशत माजवत एका रात्रीत पाच ठिकाणी सशस्त्र दरोडे टाकणाऱ्या आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या धडाकेबाज कारवाईत तीन सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या टोळीने केलेले दरोडे, जबरी चोरी आणि घरफोडीचे तब्बल 20 गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.


पोलिसांनी आरोपींकडून सुमारे 17 तोळे सोन्याचे दागिने, 324 ग्रॅम चांदीचे दागिने आणि इतर मुद्देमाल असा एकूण 25 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.


नागरिकांना मारहाण करून लुटमार


10 जून 2026 रोजी दौंड तालुक्यातील खोरवडी परिसरातील बाबीरनगर, आवडेवस्ती, आवाळेवस्ती आणि खोरवडी येथे मध्यरात्री सशस्त्र दरोडे टाकण्यात आले होते. दरोडेखोरांनी घरात घुसून नागरिकांना मारहाण केली, शस्त्रांचा धाक दाखवून रोख रक्कम, सोन्याचे दागिने, मोबाईल आणि मोटारसायकली लुटल्या. याच रात्री श्रीगोंदा हद्दीतही एक दरोडा टाकण्यात आला होता.


या मालिकेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली सहा विशेष तपास पथके तयार करण्यात आली.


50 किमी परिसरातील CCTV फुटेज तपासले


पोलिसांनी घटनास्थळांपासून तब्बल 50 किलोमीटर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि आरोपींच्या हालचालींचा मागोवा घेत अखेर अहमदनगर आणि बीड जिल्ह्यातील आरोपींपर्यंत पोलिस पोहोचले.


13 जून रोजी रात्रीभर चाललेल्या संयुक्त कारवाईत आरोपी –


गणेश मंगेश काळे (रा. कुळधरण, ता. कर्जत)


विशाल हंबरडिया काळे (रा. चिखली, ता. आष्टी, जि. बीड)


किशोर रावण भोसले (रा. बाबुळगाव खालसा, ता. कर्जत)



यांना अटक करण्यात आली. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.


20 गुन्ह्यांची कबुली


तपासादरम्यान आरोपींनी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील दरोडे, जबरी चोरी आणि घरफोडीचे 20 गुन्हे केल्याची कबुली दिली. यामध्ये दौंड, बारामती, माळेगाव, यवत, जुन्नर आणि आळेफाटा परिसरातील गुन्ह्यांचा समावेश आहे.


तसेच अहमदनगर जिल्ह्यातील आणखी 8 गंभीर गुन्ह्यांमध्ये या टोळीचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.


सराईत गुन्हेगारांचा काळा इतिहास


मुख्य आरोपी गणेश काळे याच्यावर यापूर्वी दरोडा व चोरीचे 8 गंभीर गुन्हे दाखल आहेत. विशाल काळेवर 2, किशोर भोसलेवर 1 तर फरार आरोपी प्रवीण उर्फ पप्पू भोसलेवर तब्बल 11 गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.


पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी


अवघ्या अडीच महिन्यांत स्थानिक गुन्हे शाखेने दरोडे, जबरी चोरी व घरफोडीचे अनेक गुन्हे उघडकीस आणत सुमारे 900 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. या कारवाईमुळे गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली असून नागरिकांनी पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले आहे.


"एका रात्रीत पाच दरोडे टाकून दहशत माजवणाऱ्या टोळीला बेड्या ठोकत पुणे ग्रामीण पोलिसांनी गुन्हेगारी जगताला जबरदस्त इशारा दिला आहे."

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या