सातारा/प्रतिनिधी: दिनांक 17 जून 2026,
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत झालेल्या हायव्होल्टेज ड्रामानंतर आता सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपची कोंडी करण्यासाठी महायुतीमधीलच मित्रपक्षांनी (शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस) छुपी रणनीती आखल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. जिल्हा परिषदेत मित्रपक्षांना सत्तेबाहेर ठेवून भाजपचा अध्यक्ष बसवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे नेतेच आता या निवडणुकीतून 'गायब' झाल्याने, भाजपने ही निवडणूक सोडून दिली आहे का? अशी चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगू लागली आहे. या राजकीय घडामोडींमुळे महाविकास आघाडीचे उमेदवार श्री. अभयसिंह जगताप यांच्या विजयाचे संकेत मिळत असून, भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्हा परिषदेचे 'किंगमेकर' सोलापूर जिल्ह्यात; धैर्यशील कदम एकाकी?
काही दिवसांपूर्वी सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रचंड ताकद लावली होती. मात्र, आता सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत केवळ मंत्री श्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार श्री उदयनराजे भोसले हेच उमेदवार धैर्यशील कदम यांच्या प्रचारात सक्रिय दिसत आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीत आघाडीवर असणारे मंत्री जयकुमार गोरे आणि माजी खासदार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर हे सध्या सातारा सोडून सोलापूर जिल्ह्यात फिरताना दिसत आहेत. या वजनदार जोडीने निवडणुकीतून घेतलेली ही 'पळवाट' आणि फिरवलेली पाठ पाहता, भाजपने ही निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच सोडून दिली की काय, अशी चर्चा मतदारांमध्ये सुरू झाली आहे.
शरद पवारांची 'गुप्त योजना' आणि अजित पवार गटासोबत 'डील'?
या संपूर्ण निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा श्री. शरद पवार यांनी अत्यंत गुप्तपणे हालचाली केल्याचे बोलले जात आहे. खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवारांनी काही विशिष्ट ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला पाठिंबा दिला असून, त्याच्या बदल्यात सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था या जागेसाठी अत्यंत महत्त्वाची आणि गुप्त बोलणी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांचे पारडे कमालीचे जड झाले आहे.
पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या बैठकीने वाढवले सस्पेन्स!
आज दिनांक १६ जून रोजी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. शंभूराज देसाई यांनी शिवसेना (शिंदे गट) सदस्यांची एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत सर्व स्थानिक सदस्यांचे म्हणणे आणि भाजपबद्दल असणारा तीव्र असंतोष त्यांनी ऐकून घेतला. या बैठकीनंतर बोलताना शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले की, "ते सदस्यांची हीच भूमिका शिवसेना मुख्य नेते व मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे मांडणार असून, या निवडणुकीबाबतचा अंतिम निर्णय थेट मुंबईतून घेतला जाईल." मुख्यमंत्र्यांकडे चेंडू टोलवला गेल्याने शिवसेना सदस्यांमध्ये भाजपविरोधी सूर कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मकरंद आबांच्या बैठकीत भाजपविरोधी सूर; उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवारांकडे धाव;
दुसरीकडे, मंत्री श्री. मकरंद पाटील (आबा) यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सदस्यांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत भाजपविरोधात तीव्र संताप पाहायला मिळाला. मुळात जे सदस्य स्थानिक पातळीवर भाजपच्या विरोधात लढून निवडून आले आहेत, ते आता भाजपला मतदान कसे करणार? असा रोखठोक सवाल सदस्यांनी उपस्थित केला. मकरंद आबांनी सर्व सदस्यांची हीच आक्रमक भूमिका ऐकून घेतली असून, हा सर्व प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांच्या कानावर घालून पुढील निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे.
वरिष्ठांचा आदेश आला तरी 'बंडखोरी' निश्चित!
शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्या बैठकांमधून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांची आणि सदस्यांची भाजपला मदत करण्याची अजिबात इच्छा नाही. वरिष्ठ पातळीवरून जरी युतीचा धर्म पाळण्याचा 'आदेश' मिळाला, तरी स्थानिक पातळीवर सदस्य पक्षादेश झुगारून बंडखोरी (क्रॉस व्होटिंग) करणार हे आता सूत्रांच्या हवाल्याने निश्चित मानले जात असण्याची शक्यता नाकारता येत नाही..
१५० ते २०० मतांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव होण्याची शक्यता?
सध्याचे संख्याबळ आणि स्थानिक सदस्यांमधील असंतोष पाहता, महाविकास आघाडीचे उमेदवार श्री. अभयसिंह जगताप हे भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांचा साधारण १५० ते २०० मतांच्या फरकाने दणदणीत पराभव करणार असल्याची खात्रीशीर माहिती राजकीय गोटातून मिळत आहे. मित्रपक्षांची नाराजी आणि भाजपच्याच बड्या नेत्यांची पाठ फिरवणे यामुळे धैर्यशील कदम यांची कोंडी झाली आहे.
आता येत्या १८ तारखेनंतर म्हणजेच मतमोजणी आणि निकालाच्या दिवशीच सातारा-सांगलीच्या या राजकीय भूकंपाचे खरे चित्र स्पष्ट होईल!

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज