गोमातेला राष्ट्रीय पशूचा दर्जा द्या; अन्यथा आंदोलन तीव्र करू!" – बारामतीत कुरेशी समाजाचा एल्गार

प्रांत कार्यालयासमोर तीन दिवसीय धरणे; विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा, प्रशासनाचे वेधले लक्ष



बारामती प्रतिनिधी,दि.१६- : गोमातेला राष्ट्रीय पशू घोषित करण्याच्या मागणीसाठी बारामतीतील कुरेशी समाजाने प्रांत कार्यालयासमोर आक्रमक भूमिका घेत तीन दिवसीय धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे बारामतीतील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले असून विविध संघटनांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे.


आंदोलनकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधत स्पष्ट केले की, भारतात गाय ही केवळ एक प्राणी नसून श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचे प्रतीक आहे. गोमातेची हत्या, तस्करी आणि अवहेलना यामुळे देशातील नागरिकांच्या भावना दुखावल्या जातात तसेच सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे गायीस राष्ट्रीय पशूचा दर्जा देणे ही काळाची गरज असल्याचे आंदोलनकर्त्यांनी ठामपणे मांडले.


कुरेशी समाजाच्या वतीने सांगण्यात आले की, गोमातेला राष्ट्रीय पशू घोषित केल्यास गोहत्येवर अधिक प्रभावी नियंत्रण येईल, जनावरांची अवैध तस्करी रोखली जाईल आणि या माध्यमातून निर्माण होणाऱ्या काळ्या पैशालाही आळा बसेल. तसेच गोसंरक्षणाच्या नावाखाली होणारे गैरप्रकार, खंडणीखोरी आणि समाजात निर्माण होणारे तणाव कमी होण्यास मदत होईल.


आंदोलनकर्त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात सुरू झालेल्या गोहत्या बंदीच्या प्रयत्नांचा तसेच नरेंद्र मोदी सरकारने २०१५ मध्ये केलेल्या कायद्याचा उल्लेख केला. याशिवाय देवेंद्र फडणवीस सरकारने गोहत्येच्या गंभीर प्रकरणांमध्ये कठोर कारवाईची भूमिका घेतल्याचेही आंदोलनकर्त्यांनी नमूद केले.


देशाची "राजकीय पंढरी" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामतीतून ही मागणी पुढे येत असल्याने या आंदोलनाकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे. आंदोलनाला दलित पॅंथर सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष महेश गायकवाड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका अध्यक्ष संजय वाघमारे, भारतीय युवा पॅंथर संघटनेचे संस्थापक गौरव अहीवळे, जनशक्ती कंत्राटी कामगार संघटनेचे अध्यक्ष अक्षय शिंदे व उपाध्यक्ष विशाल जगताप यांच्यासह अनेक सामाजिक व राजकीय संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.


आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बारामतीत चर्चांना उधाण आले असून, सरकार या मागणीवर कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. "गोमातेला राष्ट्रीय पशूचा दर्जा मिळालाच पाहिजे" या एकाच मागणीवर कुरेशी समाज ठाम असून, पुढील काळात आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

यावेळी कासम भाई कुरेशी सामाजिक कार्यकर्ते 
मुन्नाभाई तांबोळी भाजप अल्पसंख्याक अध्यक्ष 
अल्ताफ भाई बागवान भाजप माजी प्रदेश सदस्य 
संजय वाघमारे बारामती तालुका अध्यक्ष आरपीआय 
महेश गायकवाड महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दलित पॅंथर 
समीर गायकवाड तालुकाध्यक्ष दलित पॅंथर 
भारतीय युवा पॅंथर संघटनेचे संस्थापक गौरव अहीवळे 
जनशक्ती कंत्राटी कामगार संघ अध्यक्ष अक्षय शिंदे उपाध्यक्ष विशाल जगताप
अबू रहियान कुरेशी सालीब कुरेशी मेहबूब कुरेशी अबुताला असलम जमील कुरेशी असलम कुरेशी सलीम कुरेशी व इतर उपस्थित होते.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या