विद्यार्थी व पालकांची आर्थिक लूट थांबवा, वसूल केलेले पैसे तात्काळ परत करण्याचे आदेश
मुंबई, प्रतिनिधी,दि.१२-:राज्यातील विद्यार्थी आणि पालकांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. शाळा सोडल्याचा दाखला (टीसी) आणि गुणपत्रिका (मार्कलिस्ट) देताना कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारता येणार नाही, असे स्पष्ट करत बेकायदेशीर वसुली करणाऱ्या शाळा व महाविद्यालयांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
शिक्षण उपसंचालक डॉ. वंदना वाहूळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. जिल्ह्यातील काही नामांकित शैक्षणिक संस्थांकडून टीसी व गुणपत्रिका देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून तब्बल २०० रुपयांपर्यंत रक्कम आकारली जात असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे ई-मेल व लेखी स्वरूपात प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत विभागाने संबंधित संस्थांना इशारा दिला आहे.
वसूल केलेले पैसे परत करा
टीसी, गुणपत्रिका आणि इतर आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना विनामूल्य देणे बंधनकारक असताना काही संस्था नियमांचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीररीत्या वसूल केलेली रक्कम तात्काळ परत करावी, अन्यथा आर्थिक दंडासह प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
तक्रार कुठे कराल?
शाळा किंवा महाविद्यालयाने टीसी, गुणपत्रिका अथवा इतर शैक्षणिक कागदपत्रांसाठी अतिरिक्त शुल्काची मागणी केल्यास विद्यार्थी व पालकांनी संबंधित स्थानिक शिक्षण अधिकारी किंवा शिक्षण संचालनालयाकडे लेखी अथवा ई-मेलद्वारे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक थांबण्यास मदत होणार असून शैक्षणिक संस्थांमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज