फलटण,दि.०८: सस्तेवाडी गावातील वाढत्या वीज समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले असून ग्रामपंचायतीने महावितरणकडे तातडीने नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याची अधिकृत मागणी केली आहे. सध्या गावात कार्यरत असलेल्या 63 केव्ही ट्रान्सफॉर्मरवर अतिरिक्त भार पडत असल्याने वारंवार लो व्होल्टेजची समस्या निर्माण होत आहे. परिणामी घरगुती वीजपुरवठा विस्कळीत होत असून ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
लाईट नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे, पिण्याच्या पाण्याच्या मोटारी बंद पडत आहेत, शेतीसाठी आवश्यक असलेले पंप सुरू होत नाहीत तसेच लघुउद्योग व दैनंदिन व्यवसायांनाही मोठा फटका बसत आहे. वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामपंचायतीने गावाची वाढती लोकसंख्या व वीजेची वाढलेली गरज लक्षात घेऊन 100 केव्ही क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर तात्काळ बसवावा, अशी मागणी महावितरणकडे केली आहे. तसेच नवीन 100 केव्ही ट्रान्सफॉर्मर बसविल्यानंतर लोंढे वस्ती तसेच नाईक-निंबाळकर फार्म हाऊस परिसराला गावठाणवरून वीज जोडणी देणेही शक्य होणार असल्याचे ग्रामपंचायतीने स्पष्ट केले आहे. यामुळे त्या भागातील नागरिकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
संबंधित समस्येची गंभीरता लक्षात घेता यावर त्वरित कार्यवाही न झाल्यास भविष्यात परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, ग्रामस्थांनीही वीज समस्येचा तातडीने निपटारा न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला असून आता महावितरण प्रशासनाच्या निर्णयाकडे संपूर्ण सस्तेवाडीचे लक्ष लागले आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज