शेतरस्त्याच्या वादातून शेतकऱ्याची ६०-७० पोती बाजरी जाळून खाक

दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल; अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथील घटना


अमळनेर ,दि.८-: शेतात जाणाऱ्या रस्त्याच्या जुन्या वादातून एका शेतकऱ्याची ६० ते ७० पोती बाजरी जाळून टाकल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील जवखेडा येथे घडली. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, जवखेडा येथील आधार देवचंद पाटील (वय ६५) यांची गट क्रमांक ६८२/२ मध्ये सुमारे १ हेक्टर १४ आर शेती आहे. त्यांनी शेतात बाजरीची लागवड केली होती. गावातीलच सुभाष नथु पाटील आणि गुलाब मधुकर पाटील यांच्याशी शेतात जाणाऱ्या रस्त्यावरून गेल्या वर्षभरापासून वाद सुरू होता. या वादाचा निकाल ५ मे रोजी आधार पाटील यांच्या बाजूने लागल्याचे सांगण्यात आले.


त्याच दिवशी सायंकाळी आधार पाटील हे शेतातून जेवणासाठी घरी गेले होते. घरात पाहुणे असल्याने त्यांना शेतात परतण्यास उशीर झाला. रात्री सुमारे ११ वाजता ते शेतात पोहोचले असता, शेतातील झोपडी आणि बाजरीची गंजी आगीत जळत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच सुभाष आणि गुलाब हे दोघे घटनास्थळावरून पळून जाताना दिसल्याचे त्यांनी पोलिस तक्रारीत नमूद केले आहे.


घटनेची माहिती मिळताच आधार पाटील यांनी मुलगा संदीप पाटील तसेच दादाभाऊ पाटील, विकेश माळी, मनोज पाटील, सचिन पाटील आणि सुरेश पाटील यांना बोलावून घेतले. सर्वांनी मिळून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात येत नसल्याने गावातील जेसीबी मशीनच्या सहाय्याने गंजी मोकळी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तरीदेखील ६० ते ७० पोती बाजरी पूर्णपणे जळून खाक झाली.


यानंतर गावचे पोलीस पाटील प्रकाश कुऱ्हाडे यांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्यात सुभाष नथु पाटील आणि गुलाब मधुकर पाटील यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम ३२६(फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल काशिनाथ पाटील करीत आहेत.


शेतरस्त्याच्या किरकोळ वादातून शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या