खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीला पुणे-मुंबई महामार्गावर धडक; बेदरकार वाहनचालकांविरुद्ध व्यक्त केला संताप! 'सुदैवाने मोठा अनर्थ टळला!'

 


पुणे: [प्रतिनिधी]

पुणे-मुंबई महामार्गावर प्रवास करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार पक्ष) खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाहनाला एका खासगी वाहनाने बाजूने धडक दिली. सुदैवाने, या घटनेत खासदार सुळे आणि त्यांच्यासोबत असलेले सर्व सहकारी सुरक्षित असून मोठी दुर्घटना टळली आहे. सुप्रिया सुळे यांनी स्वतः सोशल मीडियाद्वारे या धक्कादायक अनुभवाची माहिती देत रस्ते सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रिया सुळे आज पुणे ते मुंबई असा प्रवास करत होत्या. यावेळी महामार्गावर GJ13CF5257 या क्रमांकाच्या वाहनाने अत्यंत बेदरकारपणे गाडी चालवत सुप्रिया सुळे यांच्या गाडीला बाजूने धडक दिली. या धडकेमुळे वाहनाचे नुकसान झाले असले तरी, कोणालाही दुखापत झालेली नाही.

'अतिवेग आणि निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो'

या घटनेनंतर सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत वाहनचालकांच्या वर्तवणुकीवर ताशेरे ओढले. त्यांनी म्हटले की, "हा अनुभव अत्यंत वाईट होता. अशा घटना हा एक गंभीर इशारा आहे की, आपल्या रस्त्यांवरील अतिवेग आणि निष्काळजीपणामुळे निष्पाप लोकांचे जीव धोक्यात येऊ शकतात."

नागरिकांना जबाबदारीने वाहन चालवण्याचे आवाहन;

केवळ संताप व्यक्त न करता खासदार सुळे यांनी सर्व प्रवाशांना आणि वाहनचालकांना सुरक्षेचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. "मी सर्वांना विनंती करते की, वाहन चालवताना नेहमी सीट बेल्ट लावा, सतर्क राहा आणि जबाबदारीने वाहन चालवा. आपले महामार्ग सर्वांसाठी सुरक्षित राहतील याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे," असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

या घटनेमुळे महामार्गावरील बेशिस्त वाहतूक आणि बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या