सातारा जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा सहभाग; “शिक्षकांचे अस्तित्व धोक्यात”
अनिल वीर
सातारा,दि.१०-:महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या निर्णयानुसार शिक्षक संच मान्यतेतील घातक निकषांच्या विरोधात सोमवार दि. ११ मे रोजी पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयावर राज्यभरातील शिक्षक धडक मोर्चा काढणार आहेत. या आंदोलनात सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील शेकडो अनुदानित व अंशतः अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. डॉ. विलास खंडाईत यांनी दिली.
जिल्हा संघटनेच्या ऑनलाईन बैठकीत आंदोलनाचे नियोजन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष प्रा. डॉ. विलास खंडाईत, सचिव प्रा. गोविंद वाघ, उपाध्यक्ष प्रा. सुनील शिंदे, प्रा. हणमंत मांडके, कार्याध्यक्ष प्रा. दशरथ जाधव आदी पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.
संघटनेच्या म्हणण्यानुसार शासनाच्या नवीन संच मान्यता धोरणामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करताना पवित्र पोर्टलवर रिक्त पदे उपलब्ध होणार नसल्याने नव्या पात्र शिक्षकांच्या भरतीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे शिक्षक भरतीची दारे बंद करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
संघटनेने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. वरिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर अनेक प्रश्न निर्माण झाले असताना शाळा व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण व्यवस्थेत २०२६-२७ पासून मोठे बदल करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
१५ मार्च २०२४ रोजी जाहीर करण्यात आलेल्या संच मान्यतेच्या निकषांमुळे राज्यातील सुमारे आठ हजार शाळा बंद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यापूर्वीच हजारो शिक्षक अतिरिक्त झाले असून आता आणखी दहा ते बारा हजार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक अतिरिक्त करण्याचा डाव रचला जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
विज्ञान शाखेतील प्रात्यक्षिकांसाठी पूर्वी २० विद्यार्थ्यांची बॅच असताना आता ती ४० विद्यार्थ्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच तासिका कमी करून शिक्षकांचा कार्यभार कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे.
ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सवलती रद्द करून ऑनलाईन संच मान्यता लागू केली जात असल्याने बहुजन समाजातील विद्यार्थी, विशेषतः मुली शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती संघटनेने व्यक्त केली आहे.
या घातक निर्णयाविरोधात शिक्षकांसह पालकांनीही एकत्र येण्याची गरज असल्याचे आवाहन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज