फलटण, ०२:- ग्रामपंचायत सस्तेवाडी, ता. फलटण जि. सातारा येथील ग्रामपंचायत प्रशासक व ग्रामपंचायत अधिकारी यांनी गावातील उर्वरित वाड्या-वस्त्यांना गावठाण फिडरमधून २४ तास अखंड वीजपुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता, फलटण यांच्याकडे अधिकृत मागणी केली असून सस्तेवाडी येथे गावठाण फिडरमधून गावामध्ये वीजपुरवठा वितरित करण्यात आलेला असला, तरी अजूनही अनेक वाड्या-वस्त्यांवर शेती पंपाच्या डीपीमधून वीजपुरवठा केला जात आहे. त्यामुळे त्या डीपीमधून सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहत असून ग्रामस्थांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण, घरगुती कामे तसेच दैनंदिन व्यवहारांवर त्याचा परिणाम होत असल्याने ग्रामपंचायतीने या समस्येची गंभीर दखल घेत पुढाकार घेतला आहे.
सस्तेवाडीतील सोपान बन्याबा सस्ते – सतीश कोंडिबा चव्हाण परिसर, पवार वस्ती, चोरमले वस्ती, रेल्वेलाईन परिसर, बर्गे वस्ती, शिंदे वस्ती, दाते वस्ती, लोढे वस्ती तसेच महादेवनगर या भागांना या प्रस्तावाचा मोठा लाभ होणार आहे. ग्रामस्थांच्या मूलभूत सुविधांसाठी ग्रामपंचायत सातत्याने प्रयत्नशील असून २४ तास वीजपुरवठ्याच्या मागणीस लवकरच सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज