खंडाळा,दि.९- : गावच्या यात्रेत मध्यरात्रीच्या सुमारास किरकोळ धक्काबुक्कीच्या वादातून थेट गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत दोन युवक गंभीर जखमी झाले असून यात्रेच्या वातावरणाला गालबोट लागले आहे. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यात्रेनिमित्त तमाशा पाहून घरी परतत असताना सुमित प्रदीप पवार (वय १५) व राजवीर नामदेव शिंदे यांचा धक्का आशुतोष उर्फ बंट्या संतोष जाधव (रा. साखरवाडी) याला लागला. यावरून त्यांच्यात किरकोळ बाचाबाची झाली. या वादाचा राग मनात धरून आशुतोष जाधव याने पिस्तूलातून सुमित व राजवीर यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप आहे.
या गोळीबारात सुमित पवार याच्या पोटाच्या उजव्या बाजूस तसेच डाव्या हाताच्या मनगटात गोळ्या लागल्या, तर राजवीर शिंदे याच्या उजव्या खुब्याजवळ गोळी लागली. दोघांनाही गंभीर अवस्थेत उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेनंतर आरोपी आशुतोष जाधव व त्याच्यासोबतचे दोन अल्पवयीन साथीदार दुचाकीवरून पसार झाले होते. मात्र पोलिसांनी तातडीने हालचाली करत मुख्य आरोपीला ताब्यात घेतले. फरार असलेल्या दोन अल्पवयीन संशयितांना फलटण ग्रामीण पोलिसांनी साखरवाडी परिसरातून सापळा रचून ताब्यात घेतले असून पुढील तपासासाठी त्यांना खंडाळा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, गोळीबारावेळी पिस्तूलातून चार राउंड फायर करण्यात आले होते. त्यापैकी दोन गोळ्या एका युवकाला, एक गोळी दुसऱ्या युवकाला लागली, तर एक गोळीचा नेम चुकला.
दरम्यान, साखरवाडी येथे पैसे परत न दिल्याच्या कारणावरून पिस्तूलाचा धाक दाखवत मारहाण केल्याप्रकरणीही संबंधित तिघांविरोधात शस्त्र अधिनियमासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील शेळके करीत आहेत.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज