फलटण (प्रतिनिधी): दि. 09 मे 2026,
सातारा जिल्हा परिषदेतील सत्तासंघर्षानंतर आता राजकीय हालचालींना वेग आला असून, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती आणि युवा नेते श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांना जिल्हा परिषद स्वीकृत सदस्य पदी संधी द्यावी, अशी जोरदार मागणी फलटण तालुक्यातील शिवसैनिकांनी आणि समर्थकांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे केली आहे.
जिल्हा परिषदेतील 'त्या' राड्याची पार्श्वभूमी!
नुकत्याच झालेल्या सातारा जिल्हा परिषद सत्ता स्थापनेच्या वेळी भाजपने केलेल्या राजकीय खेळी आणि त्यानंतर झालेला गदारोळ संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. या राड्याचे पडसाद थेट विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटले होते. विशेष म्हणजे, या काळात जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांना झालेली धक्काबुक्की आणि प्रशासनाचा गैरवापर यावरून शिवसैनिकांमध्ये आजही संतापाची लाट आहे. या सर्व परिस्थितीत शिवसेनेची बाजू खंबीरपणे मांडणाऱ्या नेतृत्वाची जिल्हा परिषदेत गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
का हवी विश्वजीतराजे यांना संधी?
श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर हे तालुक्यात 'डॅशिंग युवा नेतृत्व' म्हणून परिचित आहेत. त्यांची जमेची बाजू म्हणजे:
दांडगा जनसंपर्क: फलटण शहर असो वा तालुक्यातील दुर्गम वाडी-वस्ती, प्रत्येक ठिकाणी विश्वजीतराजे यांचा थेट संपर्क आहे.
शिवसेना वाढीसाठी कष्ट: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये त्यांनी रात्रंदिवस एक करून शिवसेना घराघरांत पोहोचवली आहे.
समन्वयाची भूमिका: जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्याशी त्यांचे अत्यंत निकटचे संबंध असून, जिल्हा संपर्क प्रमुख शरद कणसे आणि जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांच्याशीही त्यांचा उत्तम समन्वय आहे.
कार्यकर्त्यांची भावना;
"जर श्रीमंत विश्वजीतराजे यांच्यासारख्या आक्रमक आणि कार्यक्षम नेतृत्वाला जिल्हा परिषदेत संधी मिळाली, तर सातारा जिल्ह्यात शिवसेना अधिक प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचेल. सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांच्यासारख्या युवा नेतृत्वाची प्रशासनावर पकड असणे आवश्यक आहे," अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
पक्षाच्या निर्णयाकडे जिल्ह्याचे लक्ष;
सातारा जिल्ह्यात शिवसेना सध्या विस्ताराच्या स्थितीत आहे. अशा वेळी निष्ठावान आणि कष्टाळू कार्यकर्त्याला न्याय देऊन पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी नेतृत्व काय निर्णय घेणार, याकडे आता संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. विश्वजीतराजे यांची स्वीकृत सदस्य पदी निवड झाल्यास फलटण तालुक्यात शिवसेनेला मोठी उभारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज