पुणे/वाशिम,दि.२४- : पुणे जिल्ह्यातील तळेगाव एमआयडीसी परिसराशी संबंधित एका गंभीर घटनेत अनुसूचित जातीतील तरुणीला कथितपणे जातीय शिवीगाळ, धमक्या व शारीरिक शोषणाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडितेकडून तक्रार दाखल करण्यात आली असून, संबंधित आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, वाशिम जिल्ह्यातील दोडकी गावातील मुख्य आरोपी डाखोरे व त्याच्या साथीदारांनी पीडित तरुणीला लक्ष्य करून अपमानास्पद वागणूक दिली, तसेच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
पीडितेकडून असा आरोप करण्यात आला आहे की, स्थानिक पातळीवर पोलिसांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही. तसेच अनुसूचित जाती-जमाती आयोगालाही अद्याप या प्रकरणाची पुरेशी दखल घेतलेली नाही. दरम्यान, समाजकल्याण विभागानेही पीडितांची भेट घेतली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
राज्यात महिलांच्या सक्षमीकरणाच्या घोषणा होत असताना दलित महिलांवर असे अत्याचार होत असल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
राजकीय स्तरावरही या प्रकरणाची चर्चा सुरू असून, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील गृह विभागाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
पीडित तरुणी व तिच्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याचा दावा करत त्यांना त्वरित पोलिस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच आरोपींकडून गुन्हे मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
सर्व आरोपींना तात्काळ अटक ,पीडितांना पोलिस संरक्षण,समाजकल्याण विभागाची तातडीने भेट द्यावी ,प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी या प्रमुख मागणी करण्यात आली.
जर लवकरात लवकर कारवाई झाली नाही, तर राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशाराही संबंधितांनी दिला आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज