सातारा,दि.२६- : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कडाळे कुटुंबीयांनी आमरण उपोषण करत तीव्र आंदोलन छेडले असून, “खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करून मुलाला अडकवले जाईल” अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, अक्षय कडाळे हा शिक्षण पूर्ण करून पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत आहे. तो गेल्या पाच वर्षांपासून होमगार्ड म्हणून कार्यरत असून विविध पोलीस भरती प्रक्रियेत मैदानही उत्तीर्ण झाला आहे. मात्र, त्याच्या यशाचा द्वेष करून देवकुळे कुटुंबाकडून खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
किरकोळ वादातून सुरू झालेला हा संघर्ष आता गंभीर वळणावर पोहोचला आहे. आधी झालेल्या एनसी प्रकरणाचा तडजोडीने निपटारा झाला असतानाही, पुन्हा अल्पवयीन मुलीच्या माध्यमातून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप कडाळे कुटुंबीयांनी केला आहे. पुढे बलात्कारासारखे गंभीर गुन्हे लावण्याचा कट रचला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
तसेच, संबंधितांकडून सतत धमक्या, शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपही करण्यात आला. “त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसा असून त्याचा गैरवापर करून पोलिसांवर दबाव टाकला जात आहे,” असा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर, “आम्हाला संरक्षण द्या आणि निष्पक्ष चौकशी करा” अशी मागणी करत कडाळे कुटुंबीयांनी मुलाबाळांसह बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनाला रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहून पाठिंबा दिला. तसेच के. वनिता, दामिनी निंबाळकर, मनीषा खरात, मनीषा सोनावणे, ज्योती वाघमारे, पूजा साळुंखे, सुप्रिया येवले, मनीषा कांबळे, संजना पोतदार आदींची उपस्थिती होती.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज