नाशिक ,दि.५-: भोंदूगिरी, आर्थिक फसवणूक आणि महिलांच्या शोषणाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणात आता पोलिस तपासाने निर्णायक वळण घेतले आहे. शिर्डी पोलिसांनी तपासाचा वेग वाढवताच या प्रकरणामागील कथित ‘राजकीय मास्टरमाईंड’ कोण, याचा शोध अधिक तीव्र झाला आहे.
तपासादरम्यान खरातने सिन्नर येथील जगदंब पतसंस्था आणि यापूर्वी उघडकीस आलेल्या समता पतसंस्था यांचा मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहारांसाठी वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, जगदंब पतसंस्थेत खरातची तब्बल ३२ संशयास्पद खाती आढळून आली आहेत. यामुळे या संस्थेचे संस्थापक आणि खरातचे निकटवर्तीय मानले जाणारे नामकरण आवारे हे पोलिसांच्या रडारवर आले आहेत.
प्राथमिक तपासात असे संकेत मिळत आहेत की, अशोक खरातला ‘सिद्धपुरुष’ म्हणून समाजात ओळख निर्माण करून देण्यात आणि त्याला राजकीय व सामाजिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आवारे यांची भूमिका महत्त्वाची होती. आवारे यांचे काही राजकीय वर्तुळांशी असलेले संबंध आणि त्यांची पूर्वीची राजकीय पदे यामुळे या प्रकरणाला अधिकच संवेदनशील वळण मिळाले आहे.
दरम्यान, समता पतसंस्था प्रकरणात याआधीच खरातशी संबंधित १०० पेक्षा अधिक खात्यांची माहिती समोर आली होती. आता त्यात जगदंब पतसंस्थेतील खात्यांची भर पडल्याने या घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढली आहे.
याचबरोबर, समता पतसंस्था फेडरेशनचे राज्याध्यक्ष काका कोयटे यांनी एका मोठ्या कार्यक्रमात खरातला निमंत्रित केल्याचा मुद्दाही चर्चेत आला असून, त्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
पोलिस सध्या या दोन्ही पतसंस्थांमधील कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांचा, संबंधित व्यक्तींच्या आर्थिक नातेसंबंधांचा आणि संभाव्य राजकीय संरक्षणाचा सखोल तपास करत आहेत. तपास यंत्रणांच्या मते, लवकरच या प्रकरणात आणखी मोठी नावे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या सर्व घडामोडींमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली असून, ‘भोंदूबाबा’ प्रकरणाच्या मुळाशी असलेले राजकीय आणि आर्थिक जाळे उघड होण्याची शक्यता अधिक बळावली आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज