बारामती,दि.५- : बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी अखेर काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर करत राजकीय समीकरणांना नवे वळण दिले आहे. काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी देण्यात आली असून, ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे वडील विजयराव मोरे हे विधान परिषदेचे माजी आमदार राहिलेले आहेत.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर जाहीर झालेल्या या पोटनिवडणुकीत सुरुवातीला बिनविरोध निवड होण्याची चर्चा रंगली होती. मात्र काँग्रेसने उमेदवार देत ही शक्यता पूर्णतः फोल ठरवली आहे.
आकाश मोरे यांच्या उमेदवारीमुळे बारामतीतील निवडणूक आता अधिकच चुरशीची होणार असून, स्थानिक पातळीवरील समीकरणे, पक्षांतर्गत रणनीती आणि मतदारांचा कल याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. काँग्रेसच्या या निर्णयामुळे विरोधकांनाही नव्याने रणनीती आखावी लागणार आहे.
दरम्यान, इतर पक्षांकडून कोण उमेदवार असणार, तसेच प्रमुख नेत्यांची भूमिका काय असणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. बारामतीची ही लढत आता केवळ औपचारिक न राहता प्रतिष्ठेची बनण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज