मुंबई | प्रतिनिधी,दि.५-:महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणाऱ्या घडामोडीत अजित दादा पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे चित्र समोर येत आहे. एकेकाळी शिस्तबद्ध आणि मजबूत नेतृत्वाखाली चालणारा हा पक्ष आता अंतर्गत गटबाजी, अविश्वास आणि संभ्रमाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
पक्षातील महत्त्वाचे निर्णय पूर्वी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली घेतले जात होते. मात्र त्यांच्या निधनानंतर “आता कोणाकडे जावे?” असा प्रश्न कार्यकर्त्यांसमोर उभा ठाकला आहे. स्थानिक प्रश्न असोत किंवा राजकीय रणनीती — कोणताही ठोस मार्गदर्शक उरलेला नाही, अशी भावना पक्षात व्यक्त होत आहे.
पक्षातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते छगन भुजबळ यांच्याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे की, सध्याच्या गोंधळातून पक्षाला बाहेर काढण्यासाठी भुजबळांनी पुढे येणे अत्यावश्यक आहे.
एका कार्यकर्त्याने पत्राद्वारे थेट प्रश्न विचारला आहे — “पक्षात नेमके चालले आहे तरी काय?”
पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावरही संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रावरून पक्षात मोठा गोंधळ उडाला असून, वेगवेगळ्या नेत्यांकडून परस्परविरोधी भूमिका मांडल्या जात आहेत.
पार्थ पवार यांनी दिल्लीत पत्र मागे घेतल्याचे सांगितले, तर मुंबईत त्याचे खंडन करण्यात आले — यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणखी वाढला आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हालचालींनीही चर्चेला उधाण आले आहे. दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी प्रफुल पटेल यांच्याबाबत स्पष्ट भूमिका न मांडता, त्याच दिवशी त्यांच्या निवासस्थानी भेट दिल्याने राजकीय वर्तुळात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पुढील काही वर्षांत मोठ्या निवडणुका नसल्याने कार्यकर्त्यांना सक्रिय ठेवणे ही मोठी जबाबदारी असते. मात्र सध्याच्या परिस्थितीत कार्यक्रमांचे नियोजन, निधी वाटप आणि स्थानिक प्रश्न सोडवण्याबाबत कोणताही स्पष्ट नेता दिसत नसल्याने संघटना ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पक्षातील एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने परिस्थितीचे वर्णन करताना म्हटले आहे .
“सध्या राष्ट्रवादी ५२ पत्त्यांचा डाव विखुरल्यासारखी झाली आहे. आता एक सक्षम ‘जोकर’ येऊन हा डाव सावरणे गरजेचे आहे.”
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या एका अत्यंत नाजूक टप्प्यावर उभा आहे. मजबूत नेतृत्वाच्या अभावामुळे वाढलेली गटबाजी आणि कार्यकर्त्यांमधील संभ्रम यामुळे पक्षाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आता छगन भुजबळ यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांनी पुढाकार घेऊन पक्षाला एकत्र आणणे, हीच कार्यकर्त्यांची प्रमुख अपेक्षा आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज