कोल्हापूर,दि.२५- : ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने आज कोल्हापूर पोलीस अधीक्षक यांना निवेदन देत आमदार संजय गायकवाड यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची ठाम मागणी करण्यात आली. प्रशांत कांबी यांच्याविरोधात वक्तव्य करताना गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह व आव्हानात्मक भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. या विधानामुळे राज्यात तणाव निर्माण होऊन दंगल भडकण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मात्र, या प्रकरणात गृह विभाग कारवाई करण्याच्या मानसिकतेत दिसत नसल्याची गंभीर बाब समोर आली असल्याचे संघटनेने सांगितले. फोनवरून शिवीगाळ व धमक्या देणाऱ्यांवरही गुन्हे दाखल होत नसल्याने राज्यातील लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
हे सर्व प्रकार अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपण्याचा आणि कार्यकर्त्यांना भयभीत करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात आला.
पोलिस प्रशासनावर राजकीय दबाव आणला जात असल्याची टीका करत, संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई झाली नाही तर ऑल इंडिया पॅंथर सेना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा देण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र उपाध्यक्ष बाळासाहेब शेंडगे, सरचिटणीस जितेश जगताप, विदर्भ युवा अध्यक्ष संकेत जाधव, पीडित प्रशांत कांबी व त्यांच्या पत्नी आरती रेडेकर यांच्यासह आंबेडकरवादी, कम्युनिस्ट व पुरोगामी विचारांचे शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज