पक्षशिस्तीचा भंग महागात! मंगलदास निकाळजे यांची थेट हकालपट्टी

 सुनेत्रा पवारांना पाठिंबा जाहीर केल्याने कारवाई




पुणे/बारामती (प्रतिनिधी)दि.२०-:बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन युवा आघाडीत मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुणे जिल्हा पूर्व अध्यक्ष मंगलदास तुकाराम निकाळजे यांना पक्षशिस्त भंग केल्याच्या कारणावरून पदावरून हटवण्यात आले असून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.


निकाळजे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत सुनेत्रा पवार यांना जाहीर पाठिंबा दिला असल्याचे म्हटले होते. त्यांनी हा निर्णय जनभावना लक्षात घेऊन तसेच पुणे जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती जितेंद्र बडेकर, माजी नगरसेवक गणेश भाईजी सोनवणे, राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष गौतम शिंदे, सागर कवडे, विनय दामोदरे, अजित कांबळे आणि इतर कार्यकर्त्यांच्या विनंतीवर घेतल्याचा उल्लेख केला होता.




मात्र, पक्षाच्या अधिकृत भूमिकेविरोधात जाऊन परस्पर पाठिंबा जाहीर केल्यामुळे हा प्रकार गंभीर मानण्यात आला. त्यामुळे वंचित बहुजन युवा आघाडीच्या नेतृत्वाने तातडीने कारवाई करत निकाळजे यांना पुणे जिल्हा पूर्व अध्यक्ष पदावरून हटवले आणि पक्षातूनही निष्कासित केले.


प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी अधिकृत निवेदनात स्पष्ट केले की, “पक्षशिस्त भंग सहन केला जाणार नाही. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याची नोंद घ्यावी.”


या कारवाईमुळे बारामतीतील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या