“आठ वर्ष प्रामाणिक सेवा; पण मिळालं काय?” – मंगलदास निकाळजे यांचा संताप; अपक्ष उमेदवारीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ





बारामती ,( प्रतिनिधी)दि.२१-:“गेल्या आठ वर्षांपासून पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करत जनतेच्या प्रश्नांसाठी रात्रंदिवस झटलो. मात्र, शेवटी माझ्या वाट्याला काय आलं? फक्त अन्याय आणि दुर्लक्ष,” अशा तीव्र शब्दांत वंचित बहुजन युवा आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे यांनी आपली नाराजी व्यक्त केली.


बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असताना, निकाळजे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत पक्षाच्या निर्णयावर उघड नाराजी व्यक्त केली आहे.


निकाळजे यांनी सांगितले की, सुरुवातीला पक्षाने काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांना पाठिंबा जाहीर केला होता. मात्र, पुढे अनपेक्षित घडामोडीत आकाश मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला. या बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला.


“या सर्व प्रक्रियेत मला पक्षाकडून ए बी फॉर्म देण्यात आला नाही. अनेक वर्षे निष्ठेने काम करूनही मला डावलण्यात आले. त्यामुळेच मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.बारामती मतदारसंघातील परिस्थिती पाहता व दादांच्या जाण्याने बारामतीतील जनतेची भावना व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीचा मान ठेवून मी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला,” असे निकाळजे यांनी स्पष्ट केले.


ते पुढे म्हणाले, “पक्षनिष्ठा जपत काम केल्यानंतरही योग्य सन्मान आणि संधी मिळाली नाही. कार्यकर्त्यांच्या भावना डावलल्या गेल्या आहेत. हा अन्याय आता सहन केला जाणार नाही.”


निकाळजे यांनी सूचक इशारा देत सांगितले की, “ही केवळ माझी लढाई नाही, तर कार्यकर्त्यांच्या स्वाभिमानाची लढाई आहे. पुढील काळात ठाम भूमिका घेत जनतेसमोर जाणार.”


दरम्यान, त्यांच्या या भूमिकेमुळे बारामतीसह संपूर्ण जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले असून, आगामी निवडणुकीत याचा नेमका काय परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या