उपवर्गीकरणाचा प्रस्ताव तात्काळ रद्द करा, अन्यथा राज्यव्यापी महामोर्चा — महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे


नाशिक,दि.२० :- नाशिक येथील हॉटेल रॉयल हेरिटेज येथे उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीने महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शविण्यात आला असून प्रस्ताव तात्काळ रद्द न केल्यास राज्यभर महामोर्चा व तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष प्रकाश पगारे होते, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे मुख्य निमंत्रक महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे यांनी केले.

यावेळी बोलताना प्रकाश पगारे यांनी सांगितले की, 15 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने एकल सदस्यीय आनंद बदर समितीची स्थापना केली. मात्र अनुसूचित जातीतील 59 जातींपैकी कोणत्याही जातीचे प्रतिनिधी या समितीत समाविष्ट करण्यात आले नाहीत. तसेच समितीने राज्यातील अनुसूचित जाती समाजाकडून उपवर्गीकरणाबाबत कोणत्याही सूचना मागविल्या नाहीत. समाजाला विश्वासात न घेता गोपनीय पद्धतीने समितीने संशोधनाचे काम केल्याचा आरोप त्यांनी केला. बदर समितीच्या अहवालाला 59 पैकी 58 जातींचा विरोध असल्याचे सांगत हा अहवाल तातडीने रद्द करावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा पगारे यांनी दिला.

यावेळी समितीचे मुख्य निमंत्रक महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे यांनीही समाज एकजुटीने लढा उभारेल, असा निर्धार व्यक्त केला. तसेच समितीचे पदाधिकारी डॉ. अविनाश शिंदे यांनी 25 एप्रिल 2026 रोजी नाशिक येथे मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा केली. माजी न्यायमूर्ती अनिल वैद्य यांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.


या बैठकीस माजी नगरसेवक प्रा. कुणाल वाघ, भीमश्री विजयराज पगारे, कैलास तेलोरे, किशोर गांगुर्डे, पत्रकार भास्कर साळवे, अरुण दोंदे, हनुमंत काळे, कांचन जाधव, चंद्रकांत गायकवाड, युवा नेते प्रतीक पगारे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या