बारामती पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट! लक्ष्मण हाके यांची माघार; सुनेत्रा पवारांना पाठिंबा, लढत झाली थेट



बारामती, प्रतिनिधी ,दि.६-: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत ऐनवेळी मोठी राजकीय घडामोड घडली असून ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. विशेष म्हणजे त्यांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना जाहीर पाठिंबा दिल्याने निवडणुकीचे समीकरण अचानक बदलले आहे.


लक्ष्मण हाके यांनी सुरुवातीला निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला होता. ओबीसी समाजाच्या प्रश्नांना राजकीय व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ते मैदानात उतरणार होते. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी माघार घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.


या निर्णयामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे यांची मध्यस्थी महत्त्वाची ठरल्याचे समजते. भरणे यांनी हाके यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढली. तसेच मतदारसंघातील एकतर्फी लढत टाळून विकासाच्या मुद्द्यावर एकजूट दाखवण्याचा संदेश देण्यात आला.


दरम्यान, स्वतः सुनेत्रा पवार यांनी हाके यांच्याशी संपर्क साधत चर्चा केल्याची माहिती आहे. “वरिष्ठ नेत्यांचे फोन आणि परिस्थितीचा विचार करून मी हा निर्णय घेतला,” असे हाके यांनी स्पष्ट केले.


हाके यांच्या माघारीमुळे बारामतीतील निवडणूक आता थेट दोन प्रमुख उमेदवारांमध्ये होणार आहे. महायुतीकडून सुनेत्रा पवार तर काँग्रेसकडून आकाश मोरे मैदानात आहेत. त्यामुळे बहुकोनी लढतीऐवजी थेट सामना रंगणार असून राजकीय चुरस अधिक वाढण्याची शक्यता आहे.


राजकीय विश्लेषकांच्या मते, हाके यांच्या माघारीमुळे ओबीसी मतांचे विभाजन टळणार असून याचा फायदा महायुतीला होऊ शकतो. मात्र काँग्रेसने आपली ताकद कायम ठेवत लढत जिवंत ठेवली आहे.


एकंदरीत, लक्ष्मण हाके यांच्या माघारीमुळे बारामती पोटनिवडणूक अधिक रंगतदार आणि थेट लढतीत परिवर्तित झाली असून पुढील काही दिवसांत प्रचाराचा जोर अधिक वाढणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या