कालव्यात कोसळली भरधाव कार; तिघांचा जागीच मृत्यू, चालक गंभीर जखमी



नातेपुते, दि.४-:नातेपुतेजवळील जुन्या पालखी महामार्गावर शुक्रवारी पहाटे भीषण अपघात घडून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नीरा उजवा कालव्याच्या पुलावरून भरधाव वेगातील इर्टिगा कार थेट पाण्यात कोसळल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेत चालक मात्र जखमी अवस्थेत बचावला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कार मुंबई येथून माळशिरस तालुक्यातील फोंडशिरसकडे येत होती. शुक्रवारी पहाटे साडेचार ते पावणेपाचच्या सुमारास पुलावरून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट कालव्यात कोसळली. गाडी पाण्यात अडकून पडल्याने आतमध्ये असलेल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला.


या अपघातात प्रीती सुनील टिळेकर, हनुमंत लक्ष्मण जठार (वय ५८) आणि मंजुळा हनुमंत जठार (वय ५३) यांचा मृत्यू झाला आहे. जखमी चालक सुनील टिळेकर यांच्यावर उपचार सुरू आहेत.


मृत सर्वजण मूळचे मोगराळे येथील असून नोकरीनिमित्त मुंबई येथे वास्तव्यास होते.


घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर व त्यांच्या पथकाने तसेच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तत्काळ बचावकार्य राबवून मृतदेह बाहेर काढण्यात आले.


या भीषण घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, विशेषतः पहाटेच्या वेळी वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवण्याचे आणि अधिक दक्षता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या